शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे, त्याचसोबत एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस बजावण्यात आल्याचं वृत्त आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे.
मंगळवारी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासच्या कॅन्टीमध्ये जोरदार राडा केला होता, त्यांनी शिळे आणि खराब जेवण दिल्याचा आरोप करत कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, त्यांचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. शिंदेंच्या मंत्र्याला आलेली आयकर विभागाची नोटीस आणि संजय गायकवाड यांचं प्रकरण यावरून आता सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अंधारे नेमकं काय म्हणाल्या?
संजय शिरसाट आणि संजय गायकवाड या दोघांनी शिवसेना शिंदे गटाची चव घालवली, गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या समाधीस्थळी असायला हेवे होते. दिघेंच्या आश्रमामध्ये असायला हवे होते, मात्र ते दिल्लीत आहेत, याचाच अर्थ गुरुपौर्णिमेच्या मोक्यापेक्षा इन्कम टॅक्सचा धोका मोठा आहे का? असा खोचक सवाल अंधारे यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे ज्या दिवशी जय गुजरात म्हणाले त्याच दिवशी त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची नाळ तोडून टाकली असा टोलाही यावेळी अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
संजय शिरसाट यांना नोटीस
मंत्री संजय सिरसाट यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याच्या तक्रारीवरून संजय शिरसाट यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर येथील व्हिट्स हॉटेल प्रकरणी विरोधकांनी शिरसाट यांच्यावर आरोप केले होते, त्यानंतर त्यांच्या मुलानं टेंडर प्रक्रियेतून माघार घेतली, मात्र त्याच प्रकरणात तक्रार प्राप्त झाल्यानं संजय शिरसाट यांना आयकर विभागानं नोटीस पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे, यावरूनच आता अंधारे यांनी हल्लाबोल केला आहे.