ऑनलाईन गेममध्ये 1200 रुपये हरला, धसक्याने 16 वर्षांच्या मुलाने जीवन संपवले
Tv9 Marathi July 11, 2025 02:45 AM

ऑनलाईन गेमच्या आडून खेळल्या जाणाऱ्या जुगाराने एका सोळा वर्षांच्या मुलाचा बळी गेला आहे. लहान मुलांना मोबाईलने कसे नादाला लावले असल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. नाशिकच्या सम्राट भालेराव या १६ वर्षांच्या मुलाने मोबाईलवर गेम खेळताना अचानक विंजो मोबाईल गेम ॲप डाऊनलोड करीत त्यावर १२०० रुपये हरला. त्यानंतर घाबरुन त्याने स्वत: गळफास घेत लाखमोलाचे आयुष्य संपवल्याची घटना उघडकीस आली आहे.

सम्राट भालेराव या हा दोन बहिणींच्या पाठीवरती एकुलता एक असलेला मुलगा गमावल्याने आई-वडीलांनी टाहो फोडला आहे. त्याने त्याच्या आईच्या मोबाईलमध्ये विंजो मोबाईल गेम ॲप डाऊनलोड केला होता. त्यावर खेळताना त्याने १२०० रुपये गमावले, त्यातून तो नैराश्यात गेला आणि त्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या अशा आत्महत्येने सगळं कुटुंब हादरले आहे.

फायदा होतो म्हणून सम्राट हा गेम खेळत गेला. त्याला काही प्रमाणात पैसेही मिळाले त्यातून तो चैनीच्या वस्तू खरेदी करीत गेला. मात्र एका विशिष्ट काळानंतर मात्र तो या गेममध्ये पैसे हरू लागला. त्यानंतर त्याने आपल्या कुटुंबियांकडून देखील पैसे घेऊन हा गेम खेळणे सुरूच ठेवले. त्यामुळे या ऑनलाईन गेममध्ये लहान मुलं आणि तरुण सुरुवातीला मिळणाऱ्या पैशाच्या लालसेपोटी अडकत जातात आणि नंतर मात्र एका विशिष्ट स्टेपनंतर या ऑनलाइन गेममध्ये पैसे हरू लागतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला हवं असे सायबर तज्ज्ञांनी म्हटले आहे.

मोबाईल गेमपासून मुलांना दूर ठेवावं

गेल्या काही दिवसांपासून सायबर फ्रॉडच्या घटना वाढतच आहेत. कोणताही गेम खेळताना एका प्रमाणाच्या बाहेर कधीच पैसे जिंकू शकत नाही ही सिस्टीम त्या मोबाईल गेम ॲपमध्ये नियोजित केलेली असते त्यामुळे अशा गेमपासून आपण आपल्या मुलांना दूर ठेवावं असे सायबर तज्ज्ञ भूषण देशमुख यांनी म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.