मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. एकूण ५०८ किमी मार्गापैकी ९० टक्क्यांहून अधिक मार्ग उन्नत स्वरुपाचा आहे. मात्र मुंबईतील बीकेसी स्थानक अंडरग्राऊंड असून येथून २१ किलोमीटरचा बोगदा खणण्याचे काम सुरु आहे.या २१ किमी पैकी २.७ किमी लांबीच्या मोनोलिथिक बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आणि शिळफाटा दरम्यान बांधण्यात येत असलेल्या २१ किमी लांबीच्या बोगद्याच्या कामातली हे पहिले यश आहे. याच बोगद्यातील ७ किमीचा भाग हा ठाणे खाडीच्या खालून जाणार आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बीकेसी आणि शिळफाटा दरम्यानच्या २१ किमी लांबीच्या बोगद्याचे काम सुरु आहे. या बोगद्याच्या पहिल्या टप्प्याचे २.७ किमी लांबीच्या मोनोलिथिक बोगद्याचे बांधकाम ९ जुलै २०२५ रोजी पूर्ण झाले आहे.एकूण २१ किमी लांबीच्या बोगद्यांपैकी ५ किमी लांबीचा बोगदा शिळफाटा आणि घणसोली दरम्यान न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) वापरून बांधला जात आहे, तर उर्वरित १६ किमी लांबीचा बोगदा टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) वापरून बांधला जाणार आहे. या बोगद्यात ठाणे खाडीखाली ७ किमी लांबीचा समुद्राखालील भाग देखील समाविष्ट आहे.
एनएटीएम भागात बोगद्याचे काम जलद करण्यासाठी, एक अतिरिक्त आपात्कालिन मध्यवर्ती बोगदा (एडीआईटी) बांधण्यात आला आहे. ज्यामुळे घणसोली आणि शिळफाटा बाजूने एकाच वेळी बोगदा खणण्याचे काम सुरु झाले आहे. आतापर्यंत, शिळफाटा बाजूने सुमारे १.६२ किमी खोदकाम करण्यात आले आहे आणि एनएटीएम विभागात एकूण प्रगती अंदाजे ४.३ किमी आहे.
आजूबाजूच्या भागला कोणतेही नुकसान न करता अत्यंत सुरक्षित आणि नियंत्रितपणे बोगद्याचे काम करण्यासाठी ग्राउंड सेटलमेंट मार्कर, पायझोमीटर, इनक्लीनोमीटर, स्ट्रेन गेज आणि बायोमेट्रिक एक्सेस कंट्रोल सिस्टमसह साइटवर व्यापक सुरक्षा उपाय लागू करण्यात आले आहेत. बुलेट ट्रेनचा प्रकल्प जपानच्या आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याने राबवला जात आहे.