मुंबईत नवीन इमारतीत मराठी माणसाला घरे खरेदीसाठी आरक्षण ठेवण्याच्या मागणीवरून गुरुवारी विधानपरिषदेत दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या. मराठी माणसाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यास हात आखडता घेण्यावरून एकमेकांना अर्वाच्य व शिवराळ भाषा वापरत विधानपरिषदेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्याची वेळ उपसभापतींवर आली.
मुंबईत मराठी माणसासाठी नवीन इमारतींमध्ये ४० टक्के आरक्षण असावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लावून धरली. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी तुमच्या काळात असा कायदा का केला नाहीत. तुमचे पुतनामावशीचे प्रेम असल्याची शेरेबाजी केल्याने सभागृहात गदारोळ झाला.
विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरल्याने मराठी माणसाच्या हक्कांचे रक्षण व्हावे आणि मराठी माणसाला घरे खरेदीसाठी प्राधान्य मिळावे, यासाठी लवकरच धोरण निश्चित केले जाईल असे आश्वासन दिले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील धोरण निश्चित केली जाईल, अशी ग्वाही देसाई यांनी दिली.
नवीन इमारतीत मराठी माणसाला मुंबईत घरे खरेदीसाठी आरक्षण ठेवण्यासंदर्भात आमदार मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी देसाई यांनी उत्तर दिले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. मुंबईत घरे खरेदी करताना मराठी माणसाचा हक्क डावलू दिला जाणार नाही. जर एखादा विकासक मराठी माणसाला घरे विक्रीसाठी नाकारत असेल, अशा विकासक किंवा व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मराठी भाषकांना घरे नाकारली जाऊ नये अशी भावली भावना आहे. पण तसा कायदा असण्याची आवश्यकता व्यक्त केली. मुंबईत ४०० ते ७०० फुटांची घरे बांधण्याची सक्तीही विकसकावर केली जावी, विकसक बांधकामाच्या सुरुवातीलाच जैन मंदिर बांधतात. त्यामुळे आतमध्ये चौकशीसाठी जाण्यास मराठी माणूस घाबरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच ज्ञानेश्वर म्हात्रे, राजेश राठोड, प्रसाद लाड, ॲड.अनिल परब, सचिन अहीर, यांनी उपप्रश्न विचारले. या प्रश्नाला उत्तर देताना आमदार चित्रा वाघ यांनी भाषेनुसार घरे राखीव ठेवावी का?, अशी शंका उपस्थित के ली. २०१९ ते २०२२ या काळात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इमारतीमध्ये मराठी भाषकांसाठी सदनिका राखीव ठेवल्या होत्या का असा प्रश्न करत ठाकरे यांच्या पक्षाला डिवचले.
नेत्यांचे चिमटे
शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी सत्तेत असताना दिल्लीत वरच्या सभागृहात तुम्ही चतुर्वेदींना पाठवता, असा चिमटा काढला. मुंबईत ते स्वतः घर विकत घ्यायला गेले असता त्यांनाही तुम्ही कांदा- लसूण खाता का, अशी विचारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. वरच्या सभागृहात चतुर्वेदींना पाठवले असेल तर कनिष्ठ सभागृहात हेमंत पाटील तुम्हालाही पाठवल्याचे सांगत परब यांनी टोलवले.
मांसाहारामुळे नकार
अंबादास दानवे यांनी नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना घरे नाकारली जातात. मांसाहार करतात म्हणून मराठी लोकांना घरे नाकारली जातात. अशा विकसकांवर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना देसाई यांनी अशा प्रकारची तक्रार आली तर महायुतीचे सरकार त्या विकसकावर कारवाई करेल, असा असे स्पष्ट केले.