तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहर-जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७५ हजार जणांचा जन्म होतो. २०११ नंतर सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाखांनी वाढली असून, २०११ मध्ये सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४३ लाख १८ हजार होती आणि २०२५ मध्ये ही लोकसंख्या ५४ लाखांपर्यंत पोचली आहे.
नव्याने होणारे जन्म व दरवर्षी नोंदलेल्या मृत्यूची आकडेवारी नागरी नोंदणी पद्धती वार्षिक अहवालात असते. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७५ हजारांपर्यंत नवे जन्म होतात, पण धक्कादायक बाब म्हणजे दरवर्षी सरासरी ३२ हजार जणांचा मृत्यू होतो. सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या मागील २० वर्षांत १२ टक्क्यांनी वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ७३ टक्के लोकांची भाषा मराठी असून, साडेनऊ टक्के लोक कन्नड बोलतात. उर्वरित १७.५० टक्के लोकांच्या त्यांच्या त्यांच्या स्थानिक भाषा आहेत. सोलापूर जिल्ह्यात एक हजारामागे ८.२६ टक्के लोकसंख्या वाढ आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात जन्माच्या प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे.
दहा वर्षातून एकदा जनगणना
२०११ मधील जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४३ लाख १८ हजारांपर्यंत होती. दरवर्षी लोकसंख्येत ११ ते १२ टक्क्यांपर्यंत नैसर्गिक वाढ गृहीत धरली जाते. कोरोना काळात मात्र ही वाढ सहा ते साडेसहा टक्के होती. आता जातीनिहाय जनगणना पुढच्या वर्षी सुरू होईल. शासकीय योजनांसह महत्त्वाची धोरणे ठरविण्यासाठी लोकसंख्या महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे प्रत्येक दहा वर्षातून एकदा जनगणना होते.
- डी. एम. बंडगर, मुख्य सांख्यिकी अधिकारी, सोलापूर
जिल्ह्यातून उच्चशिक्षितांचे स्थलांतर सर्वाधिक
मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी सोलापूर जिल्ह्याची एकूण मतदारसंख्या (१८ वर्षांवरील) ३९ लाखांपर्यंत होती. त्यात १८ ते ३५ वयोगटातील तरुणांची संख्या २३ लाखांपर्यंत आहे. तरुणांची ताकद हीच जिल्ह्याच्या विकासातील जमेची बाजू आहे, पण सोलापूर जिल्ह्यातील लाखो तरुण शिक्षण विशेषत: नोकरीच्या निमित्ताने सध्या परजिल्ह्यात, परराज्यात स्थायिक आहेत. त्यामुळे हजारो कुटुंबात सध्या आई-वडील असे दोघेच असल्याची वस्तुस्थिती आहे.
तीन वर्षातील जन्म अन् मृत्यू
सन जन्म मृत्यू
२०२२ ८१,१०० ३२,२८७
२०२३ ७४,९५५ ३१,२१५
२०२४ ७३,७४९ ३२,८४०
एकूण २,२९,८०४ ९६,३४२