- डॉ. मालविका तांबे
मागच्या भागात आपण प्रो-बायोटिक्स मिळण्याकरिता वेगवेगळ्या खाद्यपदार्थांविषयी माहिती घेतली. त्यात लोणची किती महत्त्वाची असतात हे आपण पाहिले. लोणची बनवत असताना त्यात कोल्ड प्रेस्ड शेंगदाण्याचे, मोहरीचे वा तिळाचे तेल वापरणे जास्त उत्तम असते, तसेच त्याच्यात सैंधव मिठाचा वापर करणे आरोग्यादायी असते व लोणच्याची चवही उत्तम लागते.
त्यात वापरण्यात येणारी हळद, लाल तिखट हे घटक नैसर्गिक असलेले उत्तम, त्यात कुठल्याही प्रकारचे रासायनिक रंग न वापरलेले चांगले. लोणच्याला चांगला रंग येण्याकरिता अनेक जण रासायनिक रंग असलेली हळद व तिखट वापरतात, पण असे घटक वापरणे आरोग्यासाठी अहितकर असते.
याचबरोबरीने लोणचे बनविताना मोहरीची डाळ, बडीशोप, जिरे, दालचिनी, मेथी, मेथी पूड, लसूण वगैरे अन्य घटकही चांगल्या प्रतीचे वापरावेत. स्वस्तातील रिफाइंड तेले, आयोडाइज्ड मीठ, कृत्रिम रंग घालून केलेली लोणची स्वास्थ्यासाठी अपायकारक ठरतात.
लोणच्याबरोबरच आपल्याकडे पूर्वी शिरका अर्थात व्हिनेगर करायची पद्धत होती. याचाही वापर लोणची, चटण्या करताना पूर्वी हमखास केला जात असे. सध्याच्या काळात Apple cider Vinegar चा वापर बराच प्रचवित झाला आहे.
गव्हाचा चीक
सहा ते सात दिवस गहू भिजवून हळू हळू सडवला जायचा अर्थात फरमेंट केला जायचा. त्यातून तयार केलेला चीक वाढत्या मुलांच्या विकासाला मदत करण्याच्या हेतूने मुलांना दिला जात असे. हा गव्हाचा चीक पचायला हलका असतो तसेच त्यातील ग्लुटेन शरीरात कदाचित जास्त व्यवस्थित स्वीकारले जात असावे.
आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये कांजीवडा नावाची एक कृती आहे, त्यात मातीच्या भांड्याला मोहरीचे तेल लावून त्यात प्यायचे पाणी, चवीपुरती मोहरी पूड, जिरे पूड, हिंग, सैंधव मीठ, आले, हळद वगैरे घालून त्यात उडद डाळीचे तळलेले वडे घातले जात असत, हे सर्व मिश्रण फडक्यात बांधून ठेवले जात असे. साधारण ३-४ दिवसांनी उघडून खायला दिले जात असत, असे वर्णन सापडते. अजूनही भारतातील काही प्रांतांमध्ये असा प्रकारचे कंजीवडे करण्याची पद्धत आहे.
कांचीचा दुसरा प्रकार
फिकलेले गाजर - दोन मोठे, बीट रूट - एक, मोहरी पूड - दोन चमचे, मीठ - चवीपुरते.
गाजर व बीट धुवून त्यांचे २-२ इंच लांबीचे तुकडे करावे. काचेच्या बरणीत हे तुकडे टाकून त्यावर पाणी घालून त्यात मोहरी पूड व मीठ मिसळावे. बरणीचे तोंड एका फडक्याने बांधून ३-४ दिवस उन्हात ठेवावे. रोज बरणीतील मिश्रण लाकडी चमच्याने हलवावे. ३-४ दिवसांनंतर कांजीला एक वेगळा टँगी फ्लेवर येतो. अशा प्रकारे व्यवस्थित फरमेंट झालेली कांजी गाळून फ्रीजमध्ये ठेवता येते. कांजीतील भाज्या काही लोकांना खायला आवडतात किंवा त्यांच्यापासून लोणचेही करता येते.
सध्याच्या काळात लाल कोबी, कच्चा पपया, यांच्यापासून बनविलेल्या फरमेंटेड डिशेस प्रो बायोटिक्सचा स्रोत म्हणून खाण्यात येतात.
दक्षिण कोरियामध्ये भाज्यांची केलेली किमची सध्या तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. किमची बरोबरच आपल्याकडे पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी खाण्याची सवय लहान मुलांना सुरुवातीपासून ठेवल्यास त्यांना या प्रकारच्या पदार्थांची गोडी लागेल.
अशा प्रकारे प्रो बायोटिक्स घेतल्यामुळे निम्नलिखित फायदे व्हायला मदत मिळते.
पचन सुधारते व पोट रोजच्या रोज साफ व्हायला मदत मिळते. अशा फरमेंटेड गोष्टी खाण्यामुळे आपल्या पोटात असलेल्या पाचनाग्नीच्या अग्निसंवर्धनासाठी उपयोग होतो. यामुळे पचन तर व्यवस्थित राहतेच, तसेच पचलेले अन्न छोट्या व मोठ्या आतड्यांतून पुढे व्यवस्थितपणे ढकलले जाते, जेणेकरून रोज पोट व्यवस्थित साफ व्हायला मदत मिळते.
अन्नपचन व्यवस्थित झाल्यामुळे आतड्यातून पोषक गोष्टींचे शोषण व्यवस्थित व्हायला मदत मिळते, ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या जीवनसत्त्वांची कमतरता होण्यास प्रतिबंध करता येतो.
एवढेच नव्हे तर शरीरातील विषद्रव्ये बाहेर बाहेर फेकायला प्रो बायोटिक्सची मदत मिळू शकते.
सध्या बऱ्याच संशोधनाअंती दिसून येत आहे की हृदयरोग, डायबेटिस वगैरे बदलत्या जीवनशैलीमुळे दिसून येणाऱ्या रोगांपासून प्रतिबंध मिळण्यासाठी प्रो बायोटिक्सची मदत मिळू शकते.
प्रो बायोटिक्सयुक्त अन्नाचा आहारात समावेश केल्यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढते तसेच शरीरातील कुठल्याही प्रकारची सूज कमी व्हायला मदत मिळते.
लहान मुलांना साधारण वर्षभराच्या वयापासून अशा प्रकारे घरगुती केलेल्या फरमेंटेड गोष्टी देणे सुरू केल्यास त्यांच्या मेंदूचा कार्यक्षमता वाढायला मदत मिळते, पर्यायाने त्यांची कार्यशैली व स्मरणशक्ती सुधारण्यासाठी मदत मिळते. अर्थातच मोठ्यांना सुद्धा फायदा मिळतो.
मानसिकता सकारात्मक राहणे – बऱ्याच संशोधनाअंती असे दिसून आले आहे की प्रो बायोटिक्स अन्न अर्थात फरमेंडेट गोष्टी आहारात असल्या तर मानसिक वा भावनिक आजारांपासून लांब राहायला, मानसिक ताण कमी व्हायला मदत मिळते व व्यक्ती भावनात्मक दृष्ट्या दृढ राहू शकते.
आहाराला औषधासारखे वापरायचे असले तर आहारासंबंधित प्राचीन ज्ञानाचा उपयोग करणे अत्यंत तर्कसंगत ठरेल.