TCS Q1 Results : भागधारकांसाठी आनंदाची बातमी, प्रत्येक शेअरवर मिळणार 1100 टक्के लाभांश, रेकॉर्ड तारीखही जाहीर
मुंबई : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने गुरुवारी (१० जुलै) एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. जून तिमाहीत कंपनीने १२,७६० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. एक वर्षापूर्वी नफा १२०४० कोटी रुपये होता. यासोबतच TCS ने शेअरहोल्डर्ससाठी प्रति शेअर ११ रुपये अंतरिम लाभांश देखील जाहीर केला आहे.
एकत्रित महसूल
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा एकत्रित कामकाजातून मिळणारा महसूल १.३१ टक्क्यांनी वाढून ६३,४३७ कोटी रुपये झाला आहे. एक वर्षापूर्वी महसूल ६२६१३ कोटी रुपये होता. जून २०२५ च्या तिमाहीत TCS चा एकूण खर्च ४८११८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी ४७३४४ कोटी रुपयांवर होता.
लाभांशाची रेकॉर्ड तारीख
कंपनीच्या संचालक मंडळाने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी भागधारकांना प्रति शेअर ११ रुपये असा पहिला अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. रेकॉर्ड तारीख १६ जुलै २०२५ आहे. ज्या शेअरहोल्डर्सची नावे या तारखेला कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणी किंवा डिपॉझिटरीजच्या नोंदींमध्ये शेअर्सचे लाभार्थी म्हणून आढळतील ते लाभांश मिळण्यास पात्र असतील. लाभांश ४ ऑगस्ट रोजी दिला जाईल.
लाभांश इतिहास
टीसीएसच्या बोर्डाने आर्थिक वर्ष २०२५ साठी शेअरधारकांसाठी प्रति शेअर ३० रुपये अंतिम लाभांश जाहीर केला होता. यासाठी ४ जून २०२५ ही रेकॉर्ड तारीख होती. टीसीएसने डिसेंबर २०२४ च्या तिमाही निकालांच्या घोषणेसोबत प्रति शेअर १० रुपये अंतरिम लाभांश आणि प्रति शेअर ६६ रुपये विशेष लाभांश जाहीर केला होता. यासाठी रेकॉर्ड तारीख १७ जानेवारी २०२५ निश्चित करण्यात आली होती. २०२५ च्या आर्थिक वर्षात कंपनीने दोन हप्त्यांमध्ये १०- १० रुपये म्हणजेच २० प्रति शेअर रुपये अंतरिम लाभांश वितरित केला होता.
शेअर्समध्ये घसरण
१० जुलै रोजी बीएसईवर टीसीएसचे शेअर्स ३३८२.३० रुपयांवर घसरून बंद झाले. कंपनीचे मार्केट कॅप १२.२३ लाख कोटी रुपये आहे. हा शेअर्स गेल्या वर्षीच्या किमतीपेक्षा १३ टक्के आणि सहा महिन्यांपूर्वीच्या किमतीपेक्षा २१ टक्के कमी आहे.