Balochistan Attack: पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये पुन्हा मोठा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी प्रवाशांच्या बसचे अपहरण केले. बस काही अंतरावर नेली. यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. ही घटना उत्तर बलुचिस्तानमधील झोब शहराजवळ घडली. या ठिकाणी सशस्त्र हल्लेखोरांनी बस थांबवली, प्रवाशांना बाहेर काढले आणि नऊ जणांची ओळख पटवून त्यांची हत्या केली. यापूर्वी मार्च महिन्यात जाफर एक्सप्रेस ट्रेनचे बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने अपहरण केले होते.
जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, बलुचिस्तानमधील अधिकाऱ्यांनी या हल्ल्यात किमान ९ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. झोब पोलीस उपायुक्त नावेद आलम यांनी म्हटले की, क्वेट्टाहून लाहोरला जाणाऱ्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अपहरण केले. बसला लांब नेण्यात आले. त्यानंतर बसमधील सर्वांना गोळ्या घालण्यात आल्या. प्रांतीय सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी या घटनेचा निषेध केला आणि त्याला दहशतवादी कृत्य म्हटले आहे. क्रूरतेचे एक ज्वलंत उदाहरण असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानमधील नागरिकांची हत्या फितना अल-हिंदुस्तान या संघटनेने केली आहे.अपहरणाची बातमी समजल्यानंतर सुरक्षा दलांनी त्वरित उपाययोजना सुरु केल्या. परंतु हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. हल्लेखोरांचा तपास सुरु करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त नावेद आलम यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती यांनी म्हटले की, फितना अल-हिंदुस्तान या संघटनेने केलेला हा खुला दहशतवाद आहे. हल्लेखोरांनी पाकिस्तानी नागरिक असल्याची ओळख पटवून हत्या केली आहे. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य करत निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले आहे. या निष्पाप नागरिकांचे रक्त व्यर्थ जाणार नाही. हा देशाविरोधात पुकारलेला लढा आहे. आमचे उत्तर निर्णयाक आणि मजबूत असणार आहे, असे बुगती यांनी म्हटले आहे. दरम्यान, क्वेटा, लोरालाई आणि मास्टुंग येथेही तीन दहशतवादी हल्ले करण्यात आले. परंतु सुरक्षा दलांनी हे हल्ले उधळून लावले, असे बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी म्हटले आहे.