एसीएन बल्गेरिया टी20 ट्राय सिरीजमध्ये एक मोठा विक्रम रचला गेला आहे. एकाच सामन्यात धावांचा पाऊस पडला. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांना षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहता आली. हा सामना बल्गेरिया आणि जिब्राल्टर यांच्यात खेळला गेला. हा सामना बल्गेरियाने जिंकला असला तरी दोन्ही बाजूच्या फलंदाजांनी गोलंदाजांची धुलाई केली. टी20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच 14.18 च्या धावगतीने धावा केल्या गेल्या. यापूर्वी 2009 मध्ये असं घडलं होतं. तेव्हा न्यूझीलंड आणि स्कॉटलंड हे संघ आमनेसामने आले होते. तेव्हा 13.76 च्या धावगतीने धावसंख्या झाल्या होत्या. पण या सामन्यात काही चित्र वेगळं होतं. एकूण 41 षटकार मारण्यात आले . तर दोन्ही डावांमध्ये मिळून 35 पेक्षा कमी षटकात 450 हून अधिक धावा केल्या आणि जुना विक्रम मोडला गेला आहे. या विजयासह बुल्गेरियाचा संघ गुणतालिकेत चार गुणांसह अव्वल स्थानी आहे. जिब्राल्टर पराभूत झाला असला तरी त्यांच्याकडेही चार गुण आहेत. पण नेट रनरेटच्या गणितात बुल्गेरिया पुढे आहे. तुर्की या मालिकेत सहभागी असून दोन्ही सामन्यात पराभूत झाली आहे. त्यामुळे अंतिम फेरीत बुल्गेरिया आणि जिब्राल्टर हा सामना होईल.
जिब्राल्टरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 243 धावा केल्या. यात सलामीला आलेल्या फिल रॅक्सने 33 चेंडूत 73 धावांची खेळी केली. यात चार चौकार आणि 8 षटकार मारले. तर कर्णधार इयान लॅटिनने 51 धावांची खेळी केली. यात त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. लुईस ब्रूसने 24 धावा, तर ख्रिस पाईलने 22 धावांची खेळी केली. बुल्गेरियाकडून जॅकब गुलने चार षटकात 37 धावा देत 4 गडी बाद केले.
या धावांचा पाठलाग करताना बुल्गेरियाने 15 षटकातच सामना संपवला. बुल्गेरियाकडून मनन बशीरने आक्रमक फलंदाजीचं दर्शन घडवलं. त्याने 21 चेंडूत 3 चौकार आणि 9 षटकार मारत 70 धावांची खेळी केली. तर इसा जरूने 24 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकार मारत 69 धावा केल्या. मिलनग गोगेवने 69 धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार ख्रिस लाकोवने 19 धावा केल्या. जिब्राल्टरकडून लुईस ब्रूसने चार षटकात 48 धावा देत दोन गडी बाद केले.