दुसर्‍या दिवशी भूकंप दिल्ली-हारानाला मारतो
Marathi July 12, 2025 11:25 AM

हानी नाही, मात्र लोकांमध्ये भीती

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

हरियाणा आणि दिल्ली परिसरात सलग दुसऱ्या दिवशी भूकंप झाला आहे. तो 3.7 रिष्टर क्षमतेचा असल्याची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या भूकंपाची तीव्रता 4.4 रिष्टर इतकी होती. या भूकंपात विशेष हानी झाली नाही. मात्र, काही इमारतींना आणि घरांना तडे गेले आहेत. हानी नसली, तरी दोन्ही राज्यांमधील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.

हरियाणातली झज्जर येथे या भूकंपाची अधिक झळ पोहचली आहे. शुक्रवारचा भूकंप पहाटे 5 वाजून 36 मिनिटांनी जाणवला. त्याचे केंद्र भूमीखाली 10 किलोमीटरवर होते. या भूकंपामुळे 17 फेब्रुवारीला दिल्ली परिसरात झालेल्या भूकंपाच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. त्याचे केंद्र भूमीखाली 5 किलोमीटर अंतरावर होते आणि क्षमता 4 रिष्टर इतकी होती. दिल्ली आणि आसपासचे क्षेत्र तीव्र भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून मानले जाते. येथे भूकंपाची शक्यता अधिक असते.

भूकंप क्षेत्र कशासाठी…

कोट्यावधी वर्षांपूर्वी भारतीय उपखंडाचा प्रस्तर आणि युरेशिया प्रस्तर एकमेकांना भिडल्याने हिमालय पर्वत रांगांची निर्मिती झाली. हे दोन प्रस्तर जेथे एकमेकांना भिडले, तेथे आजही भूस्तरांची भूमीखाली हालचाल होत असते. त्यामुळे हे क्षेत्र भूकंपप्रवण म्हणून ओळखले जाते. येथे नेहमीच भूकंप होण्याची शक्यता असते. या क्षेत्रात अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारताची, पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशचा हिमालयीन पायथ्याचा भाग इत्यादी प्रदेशाचा समावेश होतो. येथे आजवर अनेक भूकंप झाले असून त्यामुळे लाकांना नेहमी सावध रहावे लागते. गुरुवारी आणि शुक्रवारी झालेले भूकंप कमी रिष्टर क्षमतेचे असल्याने त्यांची तीव्रता कमी होती. हानीही नगण्य झाली. मात्र, परिस्थितीला तोंड देण्यासाठी सदैव सज्जता ठेवावी लागते. या क्षेत्रात स्थानिक आणि विभागीय अशी अनेक भूकंप केंद्रे आहेत. स्थानिक केंद्रांमध्ये भूकंप झाल्यास त्याचे धक्के मोठ्या भागाला बसत नाहीत. मात्र, विभागीय केंद्रांमध्ये भूकंप झाल्यास त्याची तीव्रता अधिक असू शकते आणि त्याचे पडसाद मोठ्या प्रदेशांमध्ये उमटतात.

 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.