6….. आणि…जखमी ऋषभ पंत..! पुन्हा एकदा अर्धशतकी खेळीसह इंग्लंडला दणका
GH News July 12, 2025 08:05 PM

भारत आणि इंग्लंड तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडने सर्व गडी गमवून 387 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारताला सुरुवाताली तीन धक्के बसले. यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार शुबमन गिल स्वस्तात बाद झाले. तर करुण नायरने 40 धावांची खेळी करून काही अंशी झुंज दिली. त्यामुळे तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतावर दडपण असेल असं वाटत होतं. पण केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी टीम इंडियाला पहिल्या सत्रात सावरलं. इंग्लंडच्या गोलंदाजांना विकेटसाठी चांगलंच झुंजवलं. केएल राहुलची शतकाकडे कूच सुरु असताना ऋषभ पंतने अर्धशतक ठोकलं. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. कारण पहिल्या दिवशी झालेल्या दुखापतीमुळे तो मैदानात उतरेल की नाही याबाबत शंका होती. कारण दुसऱ्या दिवशीही ध्रुव जुरेलने विकेटकीपिंग केली होती. त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत शंका होती. पण ऋषभ पंत उतरला आणि इंग्लंडविरुद्ध अर्धशतक ठोकलं आता त्याची शतकाकडे कूच सुरु झाली आहे.

ऋषभ पंतने 86 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारला. विशेष म्हणजे 49 धावांवर असताना एक धाव घेण्याऐवजी त्याने षटकार मारून सेलीब्रेशन केलं. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 63.95 चा होता. ऋषभ पंतच्या मनात काय सुरु आहे हे इंग्लंडच्या रणनितीकारांना देखील ओळखणं कठीण झालं आहे. कधी बचावात्मक खेळ करताना आक्रमक होईल सांगता येत नाही. त्यामुळे ऋषभ पंतचं मैदानात टिकणं इंग्लंडसाठी त्रासदायक आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यातील दोन्ही डावात शतक ठोकलं होतं. तर दुसऱ्या सामन्यातही अर्धशतकी खेळी केली होती.

ऋषभ पंतने षटकारासह एक विक्रम नोंदवला आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध एकूण 35 षटकार मारले आहेत. यापूर्वी विव चिर्ड्सच्या नावावर हा विक्रम होता. त्याने 34 षटकार मारले होते. टीम साउथीने 30, यशस्वी जयस्वालने 27, तर शुबमन गिलने 26 षटकार मारले आहेत. दरम्यान, इंग्लंडमध्ये ऋषभ पंत आणि केएल राहुलच्या भागीदारीने एक विक्रम नोंदवला गेला आहे. यात 2018 मध्ये ओव्हलमध्ये या जोडीने 214, 2025 मध्ये लीड्स कसोटी 195 आणि आता लॉर्ड्सवर शतकी भागीदारी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.