क्रेडिट कार्डचा वापर सध्या आर्थिक व्यवहारांसाठी प्रमुख माध्यम ठरला आहे. अनेक जण खरेदी, हॉटेल बुकिंग, विमान तिकीट बुकिंग यासह इतर व्यवहारांसाठी क्रेडिट कार्डचा वापर केल्यास रिवॉर्ड देखील मिळतात. अनेकदा क्रेडिट कार्डची निवड करताना क्रेडिट लिमिटची निवड महत्त्वाचा भाग असतो. ग्राहक अनेकदा अधिक क्रेडिट लिमिट असलेल्या क्रेडिट कार्डला पसंती देतात. मात्र, ग्राहकांना त्यांच्यासाठी योग्य क्रेडिट लिमिट किती असावी हे माहिती नसतं. क्रेडिट कार्ड घेताना योग्य क्रेडिट लिमिटची निवड कशी करावी हे माहिती असणं आवश्यक आहे, अन्यथा कर्जात अडकण्याची शक्यता असते.
क्रेडिट कार्ड लिमिट म्हणजे तुम्ही क्रेडिट कार्डवरुन कमाल रक्कम वापरु शकता. बँक आणि वित्तीय संस्था तुमच्यं उत्पन्न, क्रेडिट स्कोअर, तुमचा कर्ज परतफेडीचा इतिहास आणि सध्याचं कर्ज या घटकांवर क्रेडिट लिमिट निश्चित होते.
अधिक क्रेडिट लिमिट देखील चांगली नसते. जर तुम्ही क्रेडिट कार्डवरील अधिक लिमिटचा वापर करत असाल तर तुमचं बजेट बिघडू शकतं. तर, कमी क्रेडिट लिमिट तुमच्या गरजांची पूर्तता करु शकत नाही. त्यामुळं तुम्हाला योग्य क्रेडिट लिमिट किती असावी हे माहिती असणं आवश्यक आहे.
तुम्हाला दरमहा जितका पगार मिळतो त्या नुसार तुम्ही कार्डची लिमिट निश्चित करु शकता. क्रेडिट कार्ड संदर्भातील सामान्य नियम हा असतो की तुमच्या मासिक उत्पन्नाच्या दोन किंवा तीन पट क्रेडिट लिमिट असावी. जर, तुम्ही दरमहा 50000 हजार रुपये कमवत असाल तर तुमची क्रेडिट लिमिट 1 लाख ते 1 लाख 50 हजार रुपयांदरम्यान असावी.
क्रेडिट कार्डची क्रेडिट लिमिट निश्चित करताना तुम्ही किराणा मालावरील खर्च, बिल, ईएमआय आणि दैनंदिन खर्च यावर विचार करणं आवश्यक आहे. तुमच्या पगाराचा किती हिस्सा कर्जाची परतफेड करण्यावर जात आहे, याचा देखील विचार केला पाहिजे. तुमच्या पगाराच्या 30 टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम ईएमआयवर जात असेल तर क्रेडिट कार्डची अधिक लिमिट निश्चित करताना विचार करणं गरजेचं आहे.
तज्ज्ञांच्या मते क्रेडिट लिमिटचा 30 टक्के खर्च क्रेडिट कार्डवरुन केला पाहिजे. तुम्ही जर यापेक्षा अधिक वापर केला तर क्रेडिट स्कोअर कमी होतो. त्यामुळं तुमची क्रेडिट लिमिट 60 हजार रुपये असेल तर तुम्ही 20 हजार रुपयांपर्यंतचा वापर क्रेडिट कार्डवरुन करु शकता.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा