भारताचे तीन संघ इंग्लंड दौऱ्यावर आहेत. वरिष्ठ पुरुष, महिला आणि अंडर 19 संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारताच्या अंडर 19 संघाचा पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध बकिंघममध्ये सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने या सामन्यात चांगली सुरुवात केली. पण आक्रमक फलंदाजी करणारा वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद झाला. त्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रे आणि विहान मल्होत्रा यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी 173 धावांची खेळी केली. या दरम्यान कर्णधार आयुष म्हात्रेने शतक पूर्ण केलं. त्याने 115 चेंडूंचा सामना केला आणि 14 चौकार आणि दोन षटकार मारले. त्याने 88.70 च्या सरासरीने 102 धावा केल्या. आयुष म्हात्रे त्याच्या शतकाचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करू शकला नाही. कारण आर्ची वॉनने त्याच्या पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याला बाद केले. एकदिवसीय मालिकेत आयुष म्हात्रे पूर्णपणे अपयशी ठरला होता. त्याने वनडे मालिकेतील चार सामन्यांच्या 4 डावांमध्ये फक्त 27 धावा केल्या. तर विहान मल्होत्राने 99 चेंडूत 9 चौकार आणि एक षटकार मारत 67 धावांची खेळी केली.
खरं तर भारतीय क्रीडाप्रेमींसाठी आजचा दिवस मेजवानी ठरला. कारण केएल राहुलनंतर भारतीय क्रीडाप्रेमींना दुसरं शतक अनुभवता आलं. केएल राहुलनेही लॉर्ड्सवर शतकी खेळी केली. त्याने 177 चेंडूचा सामना करत 100 धावा केल्या. लॉर्ड्सवर त्याचं हे दुसरं शतक ठरलं. त्याने यापूर्वी 2021 मध्ये शतक ठोकलं होतं. केएल राहुलने 56.50 च्या सरासरीने शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या 387 धावांचा पाठलाग करणं काही अंशी सोपं गेलं. अजूनही इंग्लंडकडे आघाडी आहे. पण ती आघाडी 100 धावांपेक्षा कमी आहे.
भारत आणि इंग्लंड अंडर 19 संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका आहे. पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर आघाडी घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच दुसऱ्या सामन्यातील दडपण देखील कमी होणार आहे. त्यामुळे पहिला सामना जिंकण्याचं ध्येय असणार आहे. दरम्यान भारताने पाच सामन्यांची वनडे मालिका 3-2 ने जिंकली आहे.