संधीचं सोनं करणं काय असतं? हे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप याने सिद्ध करुन दाखवलं. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंड दौऱ्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून (2-6 जुलै) वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती देण्यात आली. त्यामुळे बुमराहच्या जागी बिहारचा असलेल्या आकाश दीप याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. आकाशने या सामन्यातील दोन्ही डावात एकूण 10 विकेट्स घेतल्या. आकाशने 10 विकेट्स घेण्यासह टीम इंडियाला बर्मिंगॅहममध्ये कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलावहिला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. भारताने हा सामना तब्बल 336 धावांच्या फरकाने जिंकला.
आकाशच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत, अभ्यास, कौटुंबिक संघर्ष अशा अनेक गोष्टी आहेत. आकाशला घरातूनच क्रिकेटसाठी विरोध होता. मात्र आकाशने टेनिस क्रिकेटपासून सुरुवात केली आणि त्याने लेदर बॉलपर्यंतच्या प्रवासाला गवसणी घातली. आकाशला या दरम्यान अनेक चढ-उतारांचा ‘सामना’ करावा लागला. आकाशने वैयक्तिक आयुष्यात अनेक कसोटींवर मात केली. आकाशचा इथवरचा प्रवास कसा राहिला, हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात.
आकाशचा जन्म 15 डिसेंबर 1996 साली बिहारमधील सासाराम जिल्ह्यातील डेहरीगावात झाला.आकाचे वडील शिक्षक होते. मात्र कमी वयातच आकाशवर दु:खाचा डोंगर कोसळला. आकाशने 6 महिन्यांत वडील आणि मोठ्या भावाला गमावलं. एकाच वेळेस घरातील 2 सदस्यांच्या निधनामुळे कुटुंब अडचणीत सापडलं होतं. त्यामुळे घराची आणि आकाशची सर्व जबाबदारी आई लड्डुमा देवी यांच्यावर आली. वडील आणि भावाच्या निधनामुळे आकाशला नाईलाजाने क्रिकेटपासून दूर व्हावं लागलं. आकाशचा जवळपास 3 वर्ष क्रिकेटसोबत संबंध राहिला नाही.
आकाशच्या क्रिकेट खेळण्याला त्याच्या वडिलांचा विरोध होता. बिहारमध्ये तेव्हा क्रिकेटकडे करियर म्हणून पाहण्याचा चांगला दृष्टीकोन नव्हता. मात्र 2007 च्या टी 20 वर्ल्ड कप फायनलनंतर आकाशच्या वडिलांचा दृष्टीकोन बदलला. वडिलांच्या निधनानंतर आकाशच्या आईने त्याचं मनोबल वाढवलं. बहिणीच्या आजारामुळे आकाश मानसिकरित्या आणखी कणखर झाला. दृढ निश्चय, संकल्प, जिद्द आणि स्वत:वर विश्वास असला की माणूस कितीही अडचणी असोत तो यशस्वी होऊ शकतो, हे आकाशच्या या संघर्षावरुन स्पष्ट होतं.
आकाशचं 12 वी पर्यंतचं शिक्षण हे बिहारमध्येच झालं. आकाश त्यानंतर क्रिकेटर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पश्चिम बंगालला गेला. आकाशने तिथे क्रिकेटसह शिक्षणही सुरु ठेवलं. आकाशने तिथे टेनिस बॉल क्रिकेट खेळून खर्च भागवला. इथेच प्रतिभावान खेळाडूच्या शोधात असलेल्या टँलेट स्क्वाडचं लक्ष आकाश दीपवर गेलं. आकाशच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. आकाशला टँलेट स्क्वाडमुळे विविध वयोगटातील स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली.
आकाशला त्यानंतर काही वर्षानंतर बंगालकडून अंडर23 टीमकडून खेळण्याची संधी मिळाली. आकाशने चमकदार कामगिरी केली. त्यामुळे आकाशला 2019 साली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी 20 स्पर्धेत पदार्पणाची संधी मिळाली. आकाशने सप्टेंबर 2019 साली विजय हजारे लिस्ट एमध्ये पदार्पण केलं. आकाशने त्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेतून फर्स्ट क्लास क्रिकेटला सुरुवात केली.
आकाश 2010 साली बंगालमधील दुर्गापूर येथील एका क्रिकेट अकादमीसह जोडला गेला. आकाश सुरुवातीला बॅट्समन होता. मात्र कोचने आकाशच्या बॉलिंगमधील धार पाहिली. इथून आकाशच्या बॅट्समन टु बॉलर या प्रवासाला सुरुवात झाली.
आकाशला आरसीबीकडून 2021 साली नेट बॉलर म्हणून संधी देण्यात आली. त्यानंतर आकाशला 2022 साली 20 लाख बेस प्राईज मिळाली. आकाशने दरम्यानच्या काळात केलेल्या कामगिरीमुळे त्याने कोटींची उड्डाणं घेतली. लखनौ सुपर जायंट्सने 2025 मध्ये आकाशसाठी 8 कोटी मोजले. आकाशने आतापर्यंत आयपीएलमधील 14 सामन्यांमध्ये एकूण 10 विकेट्स घेतल्या आहेत.
आकाशने 23 फेब्रुवारी 2024 रोजी रांचीत इंग्लंड विरुद्ध कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. आकाशने पदार्पणात समाधानकारक कामगिरी केली. मात्र आकाशने बर्मिंगहॅममधील सामन्यात आपली छाप सोडली. बुमराहच्या गैरहजेरीत आकाशने मोहम्मद सिराज याला अप्रतिम साथ दिली. आकाशने पहिल्या डावात 4 तर दुसर्या डावात 6 अशा एकूण इंग्लंडच्या 10 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. आकाश यासह 49 वर्षानंतर 10 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. आकाशने ही खेळी कॅन्सरसह लढा देणाऱ्या त्याच्या मोठ्या आणि सख्ख्या बहिणीला समर्पित केली. आकाशने आता बॉलिंगने इंग्लंड विरूद्धच्या उर्वरित मालिकेतही अशीच कामगिरी करावी, अशीच आशा क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.