मुंबई : भारतीय शेअर बाजारात 7 ते 11 जुलै या दरम्यान घसरण पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्सवरील टॉप 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांचं बाजार मूल्य घटलं. तर, दोन कंपन्यांनी केवळ 5 दिवसात 47 हजार कोटींची कमाई केली आहे. सेन्सेक्सरील टॉप 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांचं बाजारमूल्य 207501.58 कोटी रुपयांनी घटलं आहे. बजाज फायनान्स आणि हिंदुस्तान यूनिलीवर या कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं आहे. या आठवड्यात सर्वाधिक नुकसान टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस आणि भारती एअरटेलचं झालं. सेन्सेक्समध्ये 932.42 अंकांची किंवा 1.11 टक्क्यांची घसरण झाली. टीसीएसचं बाजारमूल्य 56,279.35 कोटी रुपयांनी घसरुन 11,81,450.30 इतकं झालं.
भारती एअरटेलचं बाजारमूल्य देखील 54483.62 कोटी रुपयांनी घसरलं आणि 1095887.62 कोटी रुपयांवर आलं. रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य 44,048.2 कोटी रुपयांनी घसरुन 20,22,901.67 कोटी रुपये झालं. इन्फोसिसचं बाजारमूल्य 18,818.86 कोटी रुपयांनी घसरलं आणि 6,62,564.94 कोटी रुपयांवर पोहोचलं. ICICI बँकेचं बाजारमूल्य 14,556.84 कोटी रुपयांनी घसरुन 10,14,913.73 कोटी रुपये इतकं झालं. भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच (LIC) चं बाजारमूल्य 11,954.25 कोटींनी कमी झालं आणि ते 5,83,322.91 कोटी रुपयांवर आलं. HDFC Bank चं बाजारमूल्य 4,370.71 कोटी रुपयांनी कमी होऊन 15,20,969.01 कोटी रुपये झालं. भारतीय स्टेट बँकेचं बाजारमूल्य 2,989.75 कोटींनी कमी होऊन 7,21,555.53 कोटी रुपये झालं.
एकीकडे सेन्सेक्सवरील टॉप 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांचं बाजारमूल्य घसरलं असलं तरी हिंदुस्तान यूनिलीवर लिमिटेडचं बाजारमूल्य 42363.13 कोटी रुपयांनी वाढून 592120.49 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. बजाज फायनान्सचं बाजारमूल्य 5033.57 कोटींनी वाढून 580010.68 कोटी रुपये झालं आहे.
सेन्सेक्सवरील टॉप 10 कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर कायम आहे. त्यानंतर एचडीएफसी बँक,टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँक, इन्फोसिस, LIC, बजाज फायनान्स आणि हिंदुस्तान यूनिलीवर असा क्रम राहिला.
दरम्यान, टीसीएसनं पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर याच आठवड्यात केले. टीसीएसचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्याचं पाहायला मिळालं. मात्र, तो अपेक्षेइतका नसल्याची चर्चा आहे. याशिवाय टीसीएसनं लाभांश जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्टॉकमध्ये घसरण झाली. आता येणाऱ्या आठवड्यात शेअर बाजाराची स्थिती कशी राहणार या कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा