टीम इंडियाच्या गोलंदाजांनी तिसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवशी 4 झटके देत इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं आहे. इंग्लंडने तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला 387 धावांवर ऑलआऊट केल्यानंतर 1 ओव्हरमध्ये 2 रन्स केल्या. त्यानंतर बेन डकेट आणि झॅक क्रॉली या जोडीने चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. भारताला पहिल्या विकेटसाठी 5 षटकांची वाट पाहावी लागली. मात्र त्यानंतर पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. भारताने इंग्लंडला 4 झटके दिले. इंग्लंडने लंचपर्यंत 4 विकेट्स गमावून 25 ओव्हरमध्ये 98 रन्स केल्या आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या सत्रातही भारतीय चाहत्यांना गोलंदाजांकडून अशीच धारदार बॉलिंग अपेक्षित असणार आहे.
इंग्लंडच्या सलामी जोडीने तिसऱ्या दिवसातील शेवटच्या ओव्हरमध्ये वेळकाढूपणा केला. त्यामुळे कर्णधार शुबमन गिल आणि टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंडच्या सलामी जोडीवर आक्रमक झाले. शेवटच्या ओव्हरमध्ये झालेल्या या राड्यामुळे चौथ्या दिवशी काय होणार? याची क्रिकेट चाहत्यांना याची प्रतिक्षा आणि उत्सकुता होती. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडवर चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात यशस्वी कुरघोडी केली.
मोहम्मद सिराज याने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. सिराजने इंग्लंडच्या डावातील सहाव्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर बेन डकेट याला जसप्रीत बुमराह याच्या हाती कॅच आऊट केलं. भारताला यासह पहिलीवहिली विकेट मिळाली. डकेट 12 धावा करुन आऊट झाला.
त्यानंतर सिराजने 12 व्या ओव्हरमधील सहाव्या आणि शेवटच्या बॉलवर ओली पोप याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. अंपायरने आऊट देण्यास नकार दिला. त्यामुळे टीम इंडियाने या निर्णयाविरुद्द डीआरएस घेतला. टीम इंडियाचा हा निर्णय अचूक ठरला. थर्ड अंपायरने दिलेल्या निर्णयामुळे फिल्ड अंपायरला निर्णय बदलावा लागला. ओली पोप 4 धावांवर आऊट झाला. त्यामुळे इंग्लंडची स्थिती 12 ओव्हरनंतर 2 आऊट 42 अशी झाली.
पहिल्या डावातील एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेणाऱ्या नितीश कुमार रेड्डी याने दुसऱ्या डावात झॅक क्रॉली याला आऊट केलं. नितीशने झॅकला 22 धावांवर यशस्वी जैस्वाल याच्या हाती कॅच आऊट केलं. झॅकने 49 बॉलमध्ये 22 रन्स केल्या.
झॅक आऊट झाल्यानंतर हॅरी ब्रूक याची साथ देण्यासाठी जो रुट मैदानात आला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 37 धावा जोडल्या. या दरम्यान हॅरीने काही मोठे फटका मारले आणि दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. हॅरीने या दरम्यान स्कूप शॉटद्वारे 2 चौकार ठोकले. तसेच 1 सिक्स ठोकला. हॅरीने आकाश दीपच्या एकाच ओव्हरमध्ये अशाप्रकारे 15 धावा ठोकल्या. त्यानंतर आकाश दीप याने 22 व्या ओव्हरमध्ये रचनात्मक फटकेबाजी करणाऱ्या हॅरी ब्रूकचा अचूक गेम केला.
हॅरी ब्रूक क्लीन बोल्ड
आकाशने हॅरीचा मिडल स्टंप उडवत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. हॅरीने 23 धावा केल्या. इंग्लंडची स्थिती 21.3 ओव्हरमध्ये 4 आऊट 87 अशी झाली. त्यानंतर इंग्लंडने लंचपर्यंत 25 ओव्हरमध्ये 98 धावा केल्या. त्यामुळे आता लंचनंतर जो रुट आणि कॅप्टन बेन स्टोक्स जोडी भारतीय गोलंदाजांचा कसा सामना करते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.