सोन्याच्या किंमती नवी दिल्ली : वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या एका रिपोर्टमध्ये जर जगातील राजनैतिक आणि व्यापारी जोखीम कमी झाली तर नजीकच्या काळात सोन्याचे दर कमी होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. रिपोर्टमधील दाव्यानुसार जर अमेरिकन डॉलर आणि ट्रेजरी यील्ड मध्ये वाढ झाल्यास सोन्याच्या दर आणखी घसरु शकतात. केंद्री बँकांनी सोन्याची खरेदी आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांची मागणी कमी झाल्यास त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होऊ शकतो.
शुक्रवारी सोन्याचे दर 97511 रुपये प्रति तोळा इतके होते. सध्या सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होतं आहे. 2025 मध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एक तोळे सोन्याचा दर 20 हजारांपेक्षा जास्त रुपयांनी वाढला आहे. तर, चांदीच्या एक किलोचा दर देखील 20 हजारांपेक्षा अधिक रुपयांनी वाढला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळं गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून अनेक जणांनी सोने खरेदी केली. 3 नोव्हेंबर 2022 ला सोन्याचा दर जागतिक बाजारात निचांकी पातळीवर होता. त्या दिवशी सोन्याचे दर निचांकी पातळीवर म्हणजे 1429 अमेरिकन डॉलर प्रति औंस इतके होते. त्यामध्ये दुप्पट वाढ होऊन सध्या सोन्याचे दर 3287 अमेरिकन डॉलर प्रति औंस इतके झाले आहेत. म्हणजेच प्रतिवर्ष 30 टक्के सीएजीआरनं दरवाढ झाली आहे.
जगभरात केंद्रीय बँकांकडून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जात आहे. याशिवाय विविध देशांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये संघर्ष सुरु झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील आर्थिक धोरणांमुळं सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. केंद्रीय बँकांकडून व्याज दरात वाढ होत असल्यानं नोव्हेंबर 2022 ते ऑगस्ट 2024 दरम्यानच्या महागाईच्या नकारात्मक प्रभावाला संपवलं आहे. रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय की सोन्याच्या दरात रेकॉर्ड ब्रेक किंमत वाढ झाल्यानं गुंतवणकदार सतर्क झाले आहेत. दर कमी झाले तर नुकसान होऊ शकतं, असं गुंतवणूकदारांना वाटत आहे.
वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलनं यापूर्वी सोन्याचे दर घटले होते तेव्हा काय घडलं होतं याची माहिती घेत अभ्यास केला. त्यामध्ये काऊन्सिलला काही गोष्टी आढळल्या, त्या म्हणजे जगभरात राजनैतिक आणि व्यापारी स्थिती शांततेची असेल, तेव्हा सोन्याची मागणी कमी होते. याशिवाय अमेरिकन डॉलरची किंमत वाढते किंवा ट्रेजरी यील्डमध्ये वाढ होते तेव्हा सोन्यावर दबाव वाढतो. केंद्रीय बँका सोने खरेदी कमी करतात, गुंतवणूकदार देखील खरेदी कमी करतात तेव्हा सोन्याचे दर कमी होतात.
आणखी वाचा