इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या वूमन्स टीम इंडियाने इतिहास रचला. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची टी 20i मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली. भारतीय संघाची इंग्लंडमध्ये टी 20i मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. भारताने पहिले 2 सामने जिंकत मालिकेत एकतर्फी आघाडी घेतली. तर इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली. टीम इंडियाने चौथा सामना जिंकत मालिका आपल्या नावावर केली. तर 12 जुलैला झालेल्या सनसनाटी सामन्यात इंग्लंडने शेवटच्या बॉलवर 1 रन घेत सामना जिंकला. इंग्लंडने यासह टीम इंडियाला विजयी चौकार लगावण्यापासून रोखलं.
त्यानंतर आता उभयसंघात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात 16 ते 22 जुलै दरम्यान 3 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआय निवड समितीने या मालकेसाठी काही आठवड्यांआधीच संघ जाहीर केला होता. त्यानुसार या मालिकेसाठी 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. स्मृती मंधानाला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर दुसर्या बाजूला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 8 जुलैला या एकदिवसीय मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला. त्यानुसार कर्णधार नॅट सायव्हर ब्रंट हीचं संघात कमबॅक झालं आहे. नॅटला दुखापतीमुळे टी 20i मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यांना मुकावं लागलं होतं. मात्र आता नॅट वनडे सीरिजमधून कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे.
पहिला सामना, 16 जुलै, साउथम्पटन
दुसरा सामना, 19 जुलै, लॉर्ड्स
तिसरा सामना, 22 जुलै, चेस्टर ली स्ट्रीट
दरम्यान टीम इंडियाचा इंग्लंडमध्ये टी 20i मालिका जिंकल्याने विश्वास दुणावलेला आहे. त्यामुळे टीम इंडिया टी 20i प्रमाणे वनडे सीरिजमध्येही चमकदार कामगिरी करत मालिका जिंकत इंग्लंड दौऱ्याचा शेवट अविस्मरणीय करण्यात यशस्वी ठरणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुची उपाध्याय, अमनज्योत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड आणि सायली सातघरे.