नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवडीवरून नाराजी नाट्य पाहायला मिळालं. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेडच्या दक्षिजिल्हाध्यक्षपदी शिवराज पाटील होटाळकर यांची निवड जाहीर केल्यानंतर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी थेट जाहीर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली आहे. याबद्दल वरिष्ठांना बोलणार असल्याचे भास्कर पाटील म्हणाले. तर नांदेड दक्षिणसाठी खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर सुद्धा इच्छुक होत्या मात्र त्यांची निवड झाल्याने खतगावकर नाराज असल्याची चर्चा आहे.
यावर बोलताना आमदार चिखलीकर यांनी, ‘सगळ्यांना विचारात घेऊन निवड केली आहे. पक्षात कोणी अजिबात नाराज नाही पक्ष मोठा होत असताना असं थोडेफार ऐकायला मिळतं. कोणाची नाराजी नाही आम्ही सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घेतला आहे. माझी आणि भास्करराव पाटील खतगावकर यांची चर्चा झाली आणि सर्वांनी एकमताने निर्णय घेतला आहे.’ मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील धुसफूस निवडून चव्हाट्यावर आली आहे.
याबाबत बोलताना माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर म्हणाले की, ‘प्रतापराव बद्दल मी थोडीशी नाराजी व्यक्त करतो. या नियुक्त्यांबाबत आमची मुंबईला बैठक झाली. मला अतिशय दुःख आहे प्रतापरावने दक्षिणच नाव काढलं होतं. दक्षिणच्या नावाबद्दल आमच्या दोघांचे एकमत होऊन वरिष्ठ निर्णय घेणार होते. याबाबत मी वरिष्ठांशी चर्चा करणार आहे. तुमच्या नेतृत्वात आम्ही काम करायला तयार आहोत पण थोडंसं आम्हालाही स्वातंत्र्य लागेल. तुम्ही काय करायचे ते करा पण सासूबाई म्हणून थोडं आम्हाला विचारत जा, तुरीचं वरण घाला, मुगाचे घाला की पिठलं खाऊ घाला मात्र आम्हाला विचारा. ही एक माझी नाराजी आहे यावर मी वरिष्ठांशी बोलेल.’
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी म्हटलं की, ‘त्यांच्या नायगाव विधानसभेच्या वेळेस मी काम केल आहे. यावर चिखलीकर साहेब बोलले आहेत वरिष्ठ नेते बोलल्यानंतर मी बोलणे योग्य राहणार नाही. महानगरपालिकेला याचा फटका बसणार नाही चिखलीकर साहेबांचा आणि खतगावकर साहेबांचे चांगले ट्युनिंग आहे. आम्ही सगळेजण मिळून पक्ष वाढीसाठी काम करणार आहोत.’