तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत सहज जिंकेल असं वाटत होतं. कारण दुसऱ्या डावात भारतासमोर फक्त 193 धावांचं आव्हान होतं. पण भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यातही विजयाची संधी गमावल्यासारखं वाटत आहे. कारण हातात 6 विकेट असताना पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात तीन विकेट गमावल्या. त्यामुळे या सामन्यावर इंग्लंडने पूर्ण पकड मिळवली आहे. चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताने 4 विकेट गमवून 58 धावा केल्या होत्या. मात्र पाचव्या दिवशी 86 धावांवर 7 विकेट तंबूत गेल्या. यात पाचव्या दिवसापूर्वी मोठ्या बाता मारणारा वॉशिंग्टन सुंदरही फेल गेला. त्याने पूर्ण आत्मविश्वासाने पत्रकारांना सांगितलं होतं की सामना जिंकू. पण स्वत: मात्र एकही धाव न करता तंबूत परतला.
वॉशिंग्टन सुंदरने चौथ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर स्काय स्पोर्ट्ला सांगितलं की, ‘उद्या भारत नक्कीच जिंकेल. कदाचित लंचनंतर’ पण इतकं बोल्ड विधान करणारा वॉशिंग्टन सुंदरच नांगी टाकून तंबूत परतला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. ऋषभ पंत आणि केएल राहुलची विकेट पडल्यानंतर खरं तर त्याच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र त्याने अपेक्षाभंग केला. त्यामुळे भारताचा पराभव होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. वॉशिंग्टन सुंदरने 4 चेंडूंचा सामना केला आणि शून्यावर बाद झाला. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर त्यानेच झेल पकडला.
वॉशिंग्टन सुंदर म्हणाला होता की, ‘लॉर्ड्सवर विजय मिळवणे आमच्यासाठी संघ म्हणून खूप खास असेल. ते आश्चर्यकारक असेल. मला खात्री आहे की तुमच्यासाठीही. पाचव्या दिवसाचा खेळ रोमांचक होणार आहे. म्हणजे, विशेषतः चौथ्या दिवसाची शेवटची 15-20 मिनिटे खूप मनोरंजक होती. मी म्हणेन की दोन्ही ड्रेसिंग रूममध्ये आक्रमकता नेहमीच आमच्यात राहते. फक्त एक घटना (क्रॉली-गिल वाद) आणि सर्वजण आक्रमक झाले.’ लॉर्ड्सवर भारताने आतापर्यंत 19 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर 12 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर चार सामने जेमतेम ड्रॉ करण्यात यश आलं आहे.