शेअर बाजारातील घसरण थांबणार कधी? अनिश्चततेने गुंतवणूकदार धास्तावले
Marathi July 14, 2025 07:25 PM

गेल्या आठवड्यातील शेअर बाजारातील घसरण सोमवारीही सुरूच होती. आठवड्याच्या पहिल्या दिवशीही बाजारात घसरण कायम होती. जागतिक अर्थव्यवस्था आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे व्यवहारांचा वेग मंदावला होता. सुरुवातील मोठी घसरण झाली नाही. मात्र, दुपारपर्यंत आयटी सेक्टरमधील घसरणीने मुंबईशेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीतही घसरण झाली. मात्र, शेवटच्या तासात बँक निफ्टी थोडासा सावरला. त्यामुळे निफ्टीनेही तेजीत येण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात फारसे यश आले नाही. त्यामुळे बाजाराचील घसरण कधी थांबणार, असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसभरात 450 पेक्षा जास्त घसरला. मात्र, शेवटच्या तासात रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घसरण 247.01 अंकावर आली. बाजार बंद झाला त्यावेळी सेन्सेक्स 82,253.46 अंकांवर व्यवहार करत होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी दिवसभरात 148 अंकांनी घसरला. शेवटच्या तासात रिकव्हर करत घसरण -67.55 अंकावर आली. बाजार बंद झाला, त्यावेळी निफ्टी 25,082.30 वर व्यवहार करत होता.

बाजाराच्या या घसरणीदरम्यान टीसीएस आणि इन्फोसिससारखे आयटी शेअर्स रेड झोनमध्ये व्यवहार करत होते. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सुरुवातीपासूनच आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. टेक महिंद्राचे शेअर (2.50%), इन्फोसिस शेअर (2.10%) आणि टीसीएस शेअर (1.70%) घसरले. याशिवाय, एचसीएल टेक शेअर (1.50%) घसरणीसह व्यवहार करत होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगातील सर्व देशांवर टॅरिफ लादत आहेत. त्यामुळे जगभरात अनिश्चिततेचे वातावरण आहे. हे टॅरिफ 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होतील. दरम्यान, हिंदुस्थानच्या टॅरिफबाबत अद्यापही अनिश्चतता आणि गोंधळ आहे. हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करार अद्याप अंतिम झालेला नाही. त्यामुळे गुंतवणूकदार त्याबाबतच्या घोषणेची वाट पाहत आहेत. तसेच अनेक कंपन्यांच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांचा परिणामही बाजारावर दिसून येत आहे. टॅरिफबाबत सकारात्मक घोषणा झाल्यास बाजारात तेजी परत येईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.