भारत आणि इंग्लंड यांच्यात अंडर 19 कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारताने सर्वबाद 540 धावांचा डोंगर रचला. या सामन्यात कर्णधार आयुष म्हात्रेने शतकी खेळी केली. तर अभिज्ञान कुंदूने 90, राहुल कुमारने 85, तर आरएस अंबरिशने 70 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या सामन्यात वैभव सूर्यवंशीकडून अपेक्षा होत्या. मात्र त्याची खेळी 14 धावांवर संपुष्टात आली. फलंदाजीत वैभव सूर्यवंशी काही खास करू शकला नाही. मात्र गोलंदाजीत त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वैभव सूर्यवंशीने बातमी लिहीपर्यंत सामन्यात 12 षटके टाकली आणि 34 धावा देत दोन गडी बाद केले. पण त्याने पहिली विकेट घेताच एक मोठा विक्रम नोंदवला होता. इंग्लंड अंडर 19 कर्णधार हमजा शेखची विकेट घेतली. ही विकेट घेऊन युवा कसोटी सामन्यांमध्ये विकेट घेणारा सर्वात तरुण भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने 14 वर्षे आणि 107 दिवसांचा असताना ही विकेट घेतली. यासह त्याने सहा वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.2019 मध्ये मनीषीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या डावात 58 धावा देत 5 आणि दुसऱ्या डावात 30 धावा देत 2 बळी घेतले होते. युवा कसोटीत सर्वात कमी वयात विकेट घेण्याचा विक्रम पाकिस्तानच्या महमूद मलिकच्या नावावर आहे. त्याने 1994 मध्ये 13 वर्षे 241 दिवस वयाच्या असताना विकेट घेतली होती.
वैभव सूर्यवंशीने कमी वयातच क्रिकेटमध्ये पाय रोवले आहेत. त्यामुळे फलंदाजी असो की गोलंदाजी कोणता कोणता विक्रम त्याच्या नावावर नोंदवला जात आहे. वनडे मालिकेत त्याने एका शतकासह एकूण 355 धावा केल्या होत्या. युवा वनडे मालिकेतील चौथ्या सामन्यात वैभवने फक्त 52 चेंडूत शतक झळकावले. असे करून तो युवा एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला होता. आता कसोटीतही त्याने विकेट घेत विक्रमाची नोंद केली आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेच्या मेगा लिलावात वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने 1.1 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याने या किमतीला साजेशी फलंदाजी करून नाणं खणखणीत वाजवलं.त्याने आयपीएल 2025 मध्ये चमकदार कामगिरी केली. गेल्या हंगामातील 7 सामन्यांमध्ये त्याने 252 धावा केल्या. यात एक शतक आणि एक अर्धशतक होते.