भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जात आहे. पाचव्या दिवसाच्या पहिल्या तासात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी जोरदार कहर केला आणि भारताचे तीन महत्त्वाचे फलंदाज माघारी पाठवले.
कसोटीच्या अखेरच्या दिवशी रिषभ पंतकडून (Rishbh Pant) टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण पंत फक्त 9 धावा करून बाद झाला. जोफ्रा आर्चरच्या (Jofra Archer) वेगवान चेंडूवर पंत गोंधळून क्लीन बोल्ड झाला.
दिवसाची खेळी सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी पंतविषयी महत्त्वाचा सल्ला दिला होता. पण भारतीय संघाने तो सल्ला लक्षात घेतला नाही, आणि त्याची किंमत संघाला चुकवावी लागली. सामन्यापूर्वी स्काय स्पोर्ट्सशी बोलताना रवी शास्त्री यांनी भारतीय संघाला एक महत्त्वाचा सल्ला दिला होता. शास्त्री म्हणाले होते की, फलंदाजीला जाण्यापूर्वी पंतशी कोणतीही चर्चा करू नये.
त्याच्याशी काही बोलण्याची गरज नाही. जर पंतशी चर्चा केली, तर तो गोंधळेल. त्याचा मनातील कंप्यूटर काम करत आहे. पंतला पुष्कळ अनुभव मिळालेला आहे. तो इथे अनेक वेळा खेळला आहे. त्याचा फलंदाजी सरासरी 45 आहे. पंतला माहिती आहे की, काय करायचे आहे. त्याला आपल्या डावाचे महत्त्व माहिती आहे. पण हे त्याला त्याच्या पद्धतीनेच करावे लागेल. जर त्याने इतर कुणासारखी फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा उपयोग होणार नाही.
रवी शास्त्रींची ही सूचना टीम इंडियाने मानली नाही. लॉर्ड्सच्या बाल्कनीत कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) पंतशी बराच वेळ बोलताना दिसला. पंत फक्त 12 चेंडूंमध्ये 9 धावा करून माघारी गेला. त्याच्या खेळीत दोन चौकार होते. पण जोफ्रा आर्चरचा आत येणारा चेंडू पंत वाचवू शकला नाही. चेंडू थोडा खाली राहिला आणि त्याचा ऑफ स्टंप उडवून नेला.
केएल राहुलदेखील (KL Rahul) स्थिर झाल्यानंतर 39 धावा करून संघाला अडचणीत टाकून परतला. तसेच वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांचीही खेळी निराशाजनक ठरली.