अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतून करूण नायरला पुन्हा एकदा संधी मिळाली. आठ वर्षानंतर करूण नायरला पु्न्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता आलं. पण तीन सामन्यात त्याची गाडी काही पुढे गेली नाही. सहा डावात त्याला एकही अर्धशतक ठोकता आलं नाही. इतकंच काय तर पहिल्या सामन्यातील पहिल्या डावातच शून्यावर बाद झाला. तर दुसऱ्या डावात त्याने 54 चेंडूंचा सामना केला आणि 20 धावा करून बाद झाला. खरं तर काही जणांनी त्याला सहाव्या स्थानावर खेळवण्याऐवजी तिसऱ्या क्रमांकाची शिफारस केली होती. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर संधी देण्यात आली. मात्र या दोन्ही कसोटीतील चारही डावात फुसका बार निघाला. दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 31 धावांवर, तर दुसऱ्या डावात 26 धावा करून बाद झाला. भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने नायरला संधी देण्याची गोष्ट पटलावर ठेवली होती. पण करूण नायर त्यांच्या आशा पूर्ण करू शकला नाही.
करूण नायरसाठी तिसरा कसोटी सामना खूपच महत्त्वाचा होता. कारण त्याला चौथ्या सामन्यात घ्यायचं की नाही ते स्पष्ट होणार होतं. पण या सामन्यातही काही खास करू शकला नाही. तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात 62 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. तर दुसऱ्या डावात खऱ्या अर्थाने टीम इंडियाला विजयासाठी चांगल्या खेळीची अपेक्षा होती तेव्हा नांगी टाकली. तेव्हा 33 चेंडूंचा सामना करून 14 धावा करून बाद झाला. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणं कठीण दिसत आहे. करुण नायरला 23 जुलैपासून होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी प्लेइंग 11 मधून वगळण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी साई सुदर्शनला संधी मिळू शकते.
मायकल वॉनने क्रिकबझशी बोलताना स्पष्ट केलं होतं की, जर भारताने तिसरा कसोटी सामना जिंकला तर करूणसाठी चांगलं राहील. पण जर संघाने हा सामना गमावला तर मात्र त्याचं कसोटी करिअर संपुष्टात येईल. दुसरीकडे, करुण नायरच्या अशा प्रदर्शनामुळे श्रेयस अय्यरचं कसोटी क्रिकेटचं दार खुलं करू शकते. श्रेयस अय्यरने शेवटचा कसोटी सामना 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही.