शिंदेंच्या शिवसेनेत भाकरी फिरणार, लवकरच मोठे उलटफेर? समोर आली महत्त्वाची माहिती
GH News July 15, 2025 01:06 AM

वैभव घाग, टीव्ही 9 मराठी : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना हा पक्ष चांगलाच चर्चेत आहे. या पक्षातील मंत्री आणि काही आमदार यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले आहेत. असे असतानाच आता या पक्षाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या पक्षात लवकरच अंतर्गत निवडणूक घेतल्या जाण्याची शक्यता आहे. तशी तसे संकेत शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी दिले आहेत.

निवडणुका घेण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्यात आली

आज पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत लोकशाहीबाबतचा मुद्दा होता. मध्यंतरीच्या काळात पक्षात अंतर्गत निवडणुका घेण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्यात आली. पक्षात निवडणूक घेण्याची पद्धत संपली होती. ती आता पुन्हा सुरू झाली आहे, असे सांगत एखादा बोगस व्यक्ती असेल तर त्याला बाहेर केलं पाहिजे यावरही सविस्तर चर्चा झाल्याचे केसरकर यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पाया रचला जाणार 

अजून कार्यकर्त्यांच्या म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त स्ट्राईक रेट हा शिवसेनेचा आहे. पक्षाच्या निवडणुका होत असताना या निवडणुकीतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पाया रचला जाईल, असे मतही केसरकर यांनी व्यक्त केले.

पक्षात लोकशाही पद्धतीने निवडणूक होणार

तसेच पक्षांतर्गत निवडणुकीबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी अजून दिलेला नाही. यासंदर्भात चर्चा झाली असली अद्याप एकनाथ शिंदे यांनी याबाबत ठोस निर्णय दिलेला नाही. शिवसेना पक्षात सर्वच पदांसाठी निवडणूक होणार आहे. ही संपूर्ण राष्ट्राची निवडणूक असेल, असेही केसरकर यांनी सांगितले. आमच्या पक्षात लोकशाही पद्धतीने निवडणूक होणार आहे, हेदेखील केसरकर यांनी आवर्जुन सांगितले.

दरम्यान, दीपक केसरकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत वेगवेगळ्या पदांसाठी निवडणूक होणार आहे, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? तसेच एकनाथ शिंदे यांना कोणते पद दिले जाणा? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.