दारु पिऊन रात्रीच्या सुमारास जुहू बीचवर कार चालवणे तीन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. बीचवरील वाळूत कार अडकली. अखेर अग्नीशमन दलाच्या मदतीने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कार बाहेर काढण्यात आली. याप्रकरणी जुहू पोलिसांनी तिघा तरुणांवर गुन्हा दाखल करत त्यांची कार जप्त केली आहे.
तरुण यादव, नजीब सय्यद आणि ब्रिजेश सोनी अशी गुन्हा दाखल केलेल्या तरुणांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, तिघेही तरुण खार येथे रुम शेअर करून राहतात. शुक्रवारी रात्री शहरात कारने फेरफटका मारल्यानंतर तिघांनी भरपूर दारू प्यायली. यानंतर तिघे जुहू बीचवर आले.
दारूच्या नशेत तरुणांनी गाडी समुद्रकिनाऱ्यावर नेली आणि बेपर्वाहिने पाण्याजवळ चालवत राहिले. त्यांच्या या नको त्या कृत्यामुळे गाडी समुद्राजवळील वाळूमध्ये अडकली. गस्त घालणाऱ्या पोलिसांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्नीशमन दलाने दोन तास अथक प्रयत्न करून कार वाळूतून बाहेर काढली. त्यानंतर तिघांनाही पोलीस ठाण्यात नेत कडक इशारा देण्यात आला. पोलिसांनी तिघांविरोधात मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांची कार जप्त करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.