इंग्लंडने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर 22 धावांनी मात केली. इंग्लंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. इंग्लंडने भारताला 193 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारताला 170 धावांपर्यंतच पोहचता आलं. इंग्लंडचा युवा फिरकीपटू शोएब बशीर याने मोहम्मद सिराज याला आऊट करताच भारताचा डाव आटोपला. अशाप्रकारे इंग्लंडने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये भारताला सलग दुसरा विजय मिळवण्यापासून रोखलं. मात्र या सामन्यानंतर टीमला मोठा झटका लागला आहे.
इंग्लंडचा स्टार फिरकीपटू शोएब बशीर याला दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट टीमला मोठा झटका लागला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
शोएबच्या डाव्या बोटात गंभीर फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे शोएबच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शोएबला लॉर्ड्समधील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना ही दुखापत झाली. रवींद्र जडेजा याने मारलेला फटका रोखताना शोएबच्या बोटाला ही दुखापत झाली. शोएबला त्यामुळे मैदानाबाहेर जावं लागलं होतं.
शोएबच्या दुखापतीबाबत कोणतीही अपडेट नव्हती. मात्र आता वैद्यकीय पथकाने तपासणी केली. त्यानंतर शोएबच्या बोटाचं हाड तुटल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे शोएबला या मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने शोएबच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. मात्र लवकरच शोएबच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली जाऊ शकते.
शोएब बशीर कसोटी मालिकेतून आऊट
दरम्यान आता उभयसंघातील चौथा सामना हा 23 जुलैपासून होणार आहे. हा सामना मँचेस्टरमधील एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, येथे होणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा विजय मिळवून मालिका जिंकण्याचा प्रयत्न असेल. तर टीम इंडियासमोर विजय मिळवून मालिकेत 2-2 ने बरोबरी करण्याचं आव्हान असणार आहे.