फिजीमधील ऐतिहासिक सांबुला शिव मंदिरावर शुक्रवारी हल्ला झाला. मंदिरात तोडफोड करण्यात आली. ही एक धार्मिक भावना दुखावणारी घटना आहे. त्यामुळे फिजीमधील भारतीयांच्या मनात संतापाची भावना आहे. फिजीमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांवर हल्ले वाढले असून सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे असं फिजीच्या माजी अटॉर्नी जनरलनी दावा केला आहे. ऐतिहासिक सांबुला शिव मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर अय्याज सय्यद खायुम यांनी हा दावा केला. या हल्ल्यात 100 वर्ष जुन्या मुर्तीची तोडफोड करण्यात आलेली होती. या घटनेमुळे धार्मिक संघटनांमध्ये संतापाची भावना आहे.
या प्रकरणी एका 28 वर्षाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सोमवारी त्याला सुवा न्यायदंडाधिकारी कोर्टासमोर हजर करण्यात आलं. पवित्र गोष्टीची विटंबना आणि वस्तू फेकणे असे दोन आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले. आरोपीला दोन आठवड्यांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या मानसिक आरोग्याची चाचणी बाकी आहे. फेसबुकवर एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात एक माणसाने मंदिरात धुडगूस घातल्याच दिसून आलं. गर्भगृहातील मृर्तीची तो तोडफोड करताना व्हिडिओमध्ये दिसला.
श्री सनातन धर्म प्रतिनिधी सभेची मागणी काय?
फिजीच्या पोलीस आयुक्तांनी या घृणास्पद कृत्याबद्दल संताप व्यक्त केला. नागरिकांना शांतत राखण्याच आवाहन केलं. पोलीस तपासातून या हल्ल्याचा उद्देश समोर येईल. तथ्यहीन अंदाजांमुळे परिस्थिती अजून बिघडणार असं पोलीस आयुक्त म्हणाले. फिजीमधील श्री सनातन धर्म प्रतिनिधी सभेने सरकारकडे प्रार्थना स्थळांची सुरक्षा वाढवण्याची आणि कायदा अधिक कठोर करण्याची मागणी केली आहे.
फिजीमध्ये हिंदू लोकसंख्या किती?
फिजीमध्ये या शिव मंदिराभोवती कुंपण होतं. आरोपी ते कुंपण चढून मंदिरात घुसला. तिथे गर्भगृहात ठेवलेल्या मुर्त्यांची त्याने तोडफोड केली. तिथे देखभाली असलेल्या केअर टेकरवरही हल्ला केला, अशी माहिती श्री सनातन धर्म प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष धीरेन्द्र नंद यांनी दिली. या घटनेमुळे हिंदू समुदायाच्या अध्यात्मिक भावनांना मोठा धक्का बसला आहे. ते दु:खी आहेत असं नंद म्हणाले. फिजीमध्ये 24 टक्के हिंदू लोकसंख्या आहे. आर्य प्रतिनिधी सभेने सुद्धा फिजीमधील या घटनेचा कठोर शब्दात निषेध केला आहे. ही खोलवर अस्वस्थ करणारी घटना असल्याच त्यांनी म्हटलं आहे.
आर्य सभेने काय म्हटलय?
“आर्य सभा अशा घटनांकडे गुन्हेगारी कृती आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत सिद्धातांवर हल्ला म्हणून पाहते. परस्परांविषयी आदर आणि शांततेने दुसऱ्याला जगू देणं हा फिजीच्या बहुसांस्कृतिक समाज व्यवस्थेचा पाया आहे” असं आर्य सभेने म्हटलं आहे.