मुसळधार पावसाने मांदिवली पूल पाण्याखाली; पुरामुळे पुलावरील वाहतूक ठप्प
Marathi July 15, 2025 07:25 PM

मंडणगड तालुक्यात कोसळणाऱ्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच भारजा नदीला पुर आल्याने मांदिवली पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे केळशी मांदिवली देव्हारे मार्गे मंडणगडकडे जाणारी वाहतूक ठप्प पडली आहे.

दापोली तालुक्यातील आडे उटंबर आतगाव केळशी उंबरशेत रावतोली कवडोली मांदिवलीमार्गे मंडणगड तालुक्यातील चिंचघर देव्हारेमार्गे मंडणगडकडे जाणारा वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर दापोली तालुक्यातील मांदिवली आणि मंडणगड तालुक्यातील चिंचघर या दोन गावांच्या सरहद्दीवरून भारजा नदी वाहते. मंडणगड तालुक्यात उगम पावलेली नदी ही दापोली तालुक्यातील केळशी खाडीला मिळते. या नदीवर मांदिवली आणि चिंचघर गावांना जोडणारा मांदिवली नावाचा पूल आहे. या मांदिवली पुलामुळे दापोली आणि मंडणगड हे दोन तालूके एकमेकांशी जोडले जातात. या पुलामुळे दापोली तालुक्यातील बोरथळ, इळणे, मालवी, वाघिवणे, आडे शिवाजी नगर, लोणवडी, आडे,पाडले , उटंबर, आंबवली बुद्रुक, आतगाव, रोवले, उंबरशेत, केळशी, रावतोली,कवडोली , आमखोल, वांझळोली आणि मांदिवली येथील गावातील रहिवाशांना मंडणगड मार्गे पुणे,मुंबई ठाणे, पनवेल माणगाव, महाड आदी शहरांकडे येणारा एकमेव असा मार्ग आहे. तर मंडणगड तालुक्यातील वेळास, खार, साखरी,आंबवली , जावळे, गुडेघर, बाणकोट,वेसवी , कांटे, वाल्मिकी नगर, रानवली, केंगवळ, उमरोली, गोकुळगाव, नांदगाव, शिपोळे , कळकवणे, मालेगाव, कुडूक, बोरखत, गोठे, धामणी,देव्हारे ,शेवरे, चिंचघर आदी गावांना दापोली तालुक्यात येण्यासाठीचा सर्वात जवळचा मार्ग आहे.

या मार्गावर सतत एस.टी.बस वाहतूक फेऱ्या तसेच खाजगी वाहनांची वर्दळ सुरू असते. असा हा मार्गावर 15 जूनला पुलावरून पाणी वाहू लागल्याने बंद पडला होता. त्यानंतर पुन्हा आता बरोबर एक महिन्याने 15 जुलै रोजी मुसळधार पावसाने नदीला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजुकडे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मांदिवली पुलावरून पुराचे वाहणारे पाणी एकदाचे कधी ओसरेल आणि आपल्याला पुढे कधी जायला मिळेल याचीच वाट पाहत वाहन चालकांसह प्रवाशांना थांबावे लागले.

दरवर्षीच पावसाळ्यात जेव्हा मोठा पाऊस पडतो तेव्हा मांदिवली पुलावरून पुराचे पाणी वाहू लागते. त्यामुळे मंडणगड आणि दापोली तालुक्यातील काही गावांमधील नेहमी प्रवास करणाऱ्यांसह या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होते. या मार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी हा जूना पूल नव्याने बांधून पुलाची उंची वाढविणे हाच यावर उत्तम उपाय आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
– केतन निंबरे, सरचिटणीस, मांदिवली सावंत वाडी ग्राम विकास मंडळ मुंबई, ता. दापोली

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.