पुन्हा युद्ध सुरु होणार? इराणकडून तयारीला सुरुवात, संरक्षण मंत्र्यांनी दिली माहिती
GH News July 15, 2025 06:08 PM

इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली होती, मात्र युद्धबंदीनंतर परिस्थिती नियंत्रणात येत आहे. या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली असली तरी, युद्ध अजून थांबलेले नाही. सध्या दोन्ही देश गुप्तचर आणि मानसिक युद्ध लढत आहेत. जगभरातील अनेक तज्ज्ञांनी, हे युद्ध संपलेले नाही, ते मोठ्या युद्धाच्या तयारीसाठी थांबल्याचे म्हटले आहे. अशातच आछा इराणच्या संरक्षणमंत्र्यांनीही याबाबत संकेत दिले आहेत. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

इराणचे संरक्षणमंत्री अझीझ नासिरजादेह यांनी सध्याच्या युद्धबंदीवर आमचा विश्वास नाही असं विधान केले आहे. अझीझ नासिरजादेह यांनी सोमवारी तुर्कीचे संरक्षण मंत्री यासर गुलेर यांच्याशी फोनवर बोलताना सांगितले की, “इराणला युद्धबंदीवर विश्वास नाही. म्हणूनच आम्ही युद्धाची तयारी करत आहोत, लष्करी ताकदीचा आढावा घेतला जात आहे.”

पुढे बोलताना अझीझ नासिरजादेह यांनी म्हटले की, ‘आम्हाला युद्धाला चालना द्यायची नाही, मात्र शत्रूच्या आक्रमक कृतीला आम्ही कडक प्रत्युत्तर देण्यास तयार आहोत. चर्चा सुरु असताना इराणवर हल्ला झाला. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, आम्ही कराराच्या विरोधात नाही.’

12 दिवसांचे युद्ध

इस्रायलने 13 जून रोजी इराणवर हवाई हल्ले केले होते, त्यानंतर इराणनेही प्रत्युत्तर दिले होते. 12 दिवसांच्या या युद्धात सुरुवातीला अनेक अणु आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात शेकडो इराणी नागरिक ठार झाले होते, तसेच इराणने दिलेल्या प्रत्युत्तरात 27 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता, तसेच अनेक इमारतींचे नुकसान झाले होते. त्यानंतर युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता हे युद्ध पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचाही इराणवर हल्ला

इराण विरुद्ध इस्रायल हल्ल्यात अमेरिकेनेही उडी घेतली होती, अमेरिकेने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला केला होता. याला उत्तर देताना इराणनेही आखाती देशांमधील अनेरिकन एअरबेसवर हल्ला केला होता. त्यामुळे अनेकांना तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाल्याचे म्हटले होते, मात्र काही दिवसांनी युद्धबंदीचा निर्णय झाला होता, त्यामुळे हा संघर्ष थांबला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.