मोठी बातमी! शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले, कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात लँडिंग
GH News July 15, 2025 06:08 PM

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला 4 अंतराळवीरांसह पृथ्वीवर परतले आहेत. त्यांचे ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरले आहे. शुभांशू हे सुमारे 18 दिवस अवकाशात होते, या काळात त्यांनी अनेक प्रयोगही केले. शुभांशू शुक्ला हे 25 जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून फाल्कन 9 रॉकेटने अंतराळात गेले होते. आता ते सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत.

शुभांशू शुक्ला हे अमेरिका, पोलंड, हंगेरीतील आपल्या 3 सहकारी अंतराळवीरांसह 14 जुलै रोजी दुपारी 4.45 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीकडे निघाले होते. आता हे सर्व अंतराळवीर 15 जुलै रोजी पृथ्वीवर उतरले आहेत. आता सर्व अंतराळवीरांना समुद्रातून बाहेर काढले जात आहे.

10 दिवस देखरेखीखाली राहणार

शुभांशू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आणि अंतराळातील त्यांच्या शरीरावर झालेल्या परिणामांतून बरे होण्यासाठी 10 दिवस देखरेखीखाली ठेवले जाणार आहेत. त्यानंतर ते भारतात परतण्याची शक्यता आहे. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे.

शुभांशू भारताचे दुसरे अंतराळवीर

शुभांशू शुक्ला हे 1984 नंतर अंतराळात जाणारे भारताचे दुसरे अंतराळवीर आहेत. यापूर्वी राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळात प्रवास केला होता. शुभांशू यांच्या या मोहिमेनंतर भारत आगामी काळात अंतराळ स्थानक स्थापन करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शुभांशू यांची ही मोहीम खास आहे.

शुभांशू यांनी अनेक प्रयोगांमध्ये घेतला भाग

शुभांशू शुक्ला हे भारतीय हवाई दलात स्क्वाड्रन कमांडर आहे. त्यांना 2000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. शुभांशू यांनी आपल्या 18 दिवसांच्या अंतराळातील कार्यकाळात 60 हून अधिक प्रयोगांमध्ये भाग घेतला आहे. ज्यात भारताच्या 7 प्रयोगांचा समावेश आहे. शुभांशू यांनी अंतराळात मेथी आणि मूगाचे बीजचा अभ्यास केला.

शुभांशू यांच्या पालकांनी केली होती प्रार्थना

अ‍ॅक्सिओम-4 मोहिमेतील ड्रॅगन अंतराळयान काल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीच्या दिशेने निघाले होते. यावेळी शुभांशू शुक्ला यांच्या पालकांनी त्यांच्या सुरक्षित लँडिंगसाठी प्रार्थना केली होती. त्यांच्या वडिलांनी सांगितले होते की, “अँडॉकिंग सुरक्षितपणे झाल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आमचा देवावर विश्वास आहे. लँडिंग देखील सुरळीत होईल अशी आम्हाला आशा आहे.”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.