उधव ठाकरे: लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मोठे यश मिळवले होते. तर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीला (Mahayuti) पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीने महाविकास आघाडीचा जोरदार पराभव केला. या पराभवानंतर महाविकास आघाडीतून अनेक लोकप्रतिनिधी आपापल्या पक्षांना रामराम ठोकत महायुतीच्या दिशेने वळत आहेत. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) एकामागे एक धक्के गेल्या काही दिवसांपासून बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रपूरचे (Chandrapur) जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे (Ravindra Shinde) हे पक्षाला जय महाराष्ट्र करून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आणि नुकतेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवडून आलेले रवींद्र शिंदे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबईत त्यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. रवींद्र शिंदे हे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर यापूर्वी चार वेळा संचालक म्हणून निवडून आले असून, बँकेच्या राजकारणात त्यांची ओळख ‘किंगमेकर’ अशी आहे.
यंदा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर 21 संचालकांपैकी 9 जागांवर भाजप समर्थक उमेदवार निवडून आले आहेत. ही कामगिरी बँकेच्या इतिहासात भाजपसाठी पहिलीच एवढ्या मोठ्या प्रमाणावरची आहे. त्यामुळेच, शिंदेंच्या राजकीय ताकदीची आणि बँकेत त्यांच्या प्रभावाची दखल घेऊन भाजपकडून त्यांना अध्यक्षपद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या साऱ्या घडामोडींमध्ये भाजप आमदार बंटी भांगडिया यांची खेळी निर्णायक ठरली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बँकेवर आपली ताकद वाढवली असून पहिल्यांदाच जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचा अध्यक्ष बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे यांच्याकडे स्वतःचे 4 ते 5 संचालक असल्याने त्यांना अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
दरम्यान, आजवर काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या बँकेत भाजपचे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात संचालक निवडून आले आहेत. हे काँग्रेससाठी मोठे राजकीय आव्हान ठरणार आहे. शिंदे यांचा भाजप प्रवेश आणि अध्यक्षपदाच्या शक्यतेमुळे, बँकेच्या नेतृत्वाची दिशा आणि धोरणे देखील बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा