मनसे नेते प्रकाश महाजन हे पक्षात नाराज असल्याचे समोर आले आहे. पक्षाने मला साथ दिली नाही असा आरोप महाजन यांनी केला आहे. तसेच पक्षात आमची किंमत नाही असंही महाजन यांनी म्हटलं आहे. गेल्या महिन्यात प्रकाश महाजन आणि राणे पिता-पुत्रांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते, त्यानंतर आता महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे, त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
प्रकाश महाजन यांनी संभाजीनगरमध्ये बोलताना नाराजी व्यक्त करत म्हटले की, ‘जनतेसमोर कोणत्या तोडावेने जावे, घरातच आमची किंमत नाही. इतर वेळी प्रवक्ता म्हणून जीव तोडून पक्षाची बाजू मांडतो, मात्र त्याला तुम्ही बोलवत नाही. पक्षात दिवाळी आहे, पण माझ्या घरात अंधार आहे.’ मनसेच्या शिबिराला न बोलावल्यामुळे महाजन यांनी असं म्हटलं असल्याचे बोलले जात आहे.
पुढे बोलताना महाजन म्हणाले की, ‘नारायण राणे प्रकरणात पक्षाने माझी साथ दिली नाही, मलाच फाशी, पण मी विसरलो. प्रवक्ते बोलत आहेत, पण फक्त माझ्यासाठी अटी होत्या का? पण मी देव बदलणार नाही, पण देवाने बोलविल्या शिवाय जाणार नाही. माझी भक्ती खरी असेल तर माझा पांडुरंग मला बोलवेल.’
नाराजी व्यक्त करताना महाजन म्हणाले की, ‘मला मान नाही, आता मी प्रवक्ता नाही. राणेंना अंगावर घेतलं, त्याचं हे फळ मिळत आहे. मी आता घरी बसणार आहे. यातना होत आहे, चार दिवस झोपलो नाही. राणेंना भिडलो तेव्हा पक्षाचं कुणीच सोबत नव्हतं. डोळ्यात पाणी आलं, का जिवंत राहिलो असं वाटत आहे. आमचा अंधारात अपमान झाला का? माझा राग कुणावर नाही, माझा नशीबावर विश्वास आहे. जिथे सन्मान नाही ,तिथे उपाशी राहू शकतो, पण अपमान सहन करू शकत नाही असं महाजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, प्रकाश महाजन आणि राणे पितापुत्रांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. नितेश राणे यांना वैचारिक उंची नाही, असं म्हणत महाजन यांनी राणे यांची तुलना लंवग आणि वेलचीशी केली होती. त्यानंतर नारायण राणे यांनी धमकी दिल्याचा आरोप प्रकाश महाजन यांनी केला होता. माझ्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर त्याला नितेश राणे जबाबदार राहतील, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं होतं.