जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. इराणसोबतच्या युद्धानंतर इस्रायलने आता आणखी एका युद्धात उडी घेतली आहे. इस्रायलने सीरियाच्या स्वैदा प्रदेशात हल्ला केला आहे. या भागात ड्रुझ समुदायावर हल्ला केल्यामुळे इस्रायलने थेट सीरियन सैन्यावर हल्ला केला आहे. सीरिन रणगाड्यांवर बॉम्बचा वर्षाव करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, इस्रायलने दक्षिण सीरियातील स्वैदा प्रदेशातील सिरियन सैन्य तळांवर हल्ला केला. या भागात राहणाऱ्या ड्रुझ समुदायाच्या सुरक्षिततेसाठी इस्रायलने ही कारवाई केल्याचे समोर आले आहे. याचे आणखी एक कारण म्हणजे देशाच्या सुरक्षेसाठी इस्रायलला आपल्या सीमेला लागून असलेल्या या भागात शस्त्रे नको आहेत, त्यामुळेच हा हल्ला करण्यात आला आहे.
आकाशात ड्रोनच्या घिरट्या
स्वैदामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सतत गोळीबार होत आहे. आज या भागात 4 ठिकाणी स्फोट झाल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक ड्रोन आकाशात घिरट्या घालत होते. त्यामुळे या भागात भीती आणि तणावाचे वातावरण आहे. इस्रायलने केलेल्या या कारवाईमागे प्रमुख ड्रुझ नेते शेख हिकमत अल-हजरी यांचे विधानही जबाबदार आहे. शेख यांनीसीरियन सरकारवर युद्धबंदीचा भंग करून स्वतःच्या नागरिकांवर बॉम्बहल्ला केल्याचा आरोप केला होता, त्यामुळे इस्रायलने हा हल्ला केला.
शेख हिकमत अल-हजरी यांनी ड्रुझ तरुणांना सरकारविरुद्ध लढा उभारण्याचे आवाहन केले आहे. आता सीरियाचे संरक्षण मंत्री मुरहाफ अबू कासरा यांनी संपूर्ण भागात युद्धबंदी लागू केली आहे. जोपर्यंत समोरून हल्ला होणार नाही तोपर्यंत सीरियन सैन्य गोळीबार करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
ड्रुझ समाजाचे रक्षण करणार
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी ड्रुझ समाजाचे रक्षण करणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, सीरियन सरकार स्वैदामध्ये शस्त्रांसह पोहोचले होते ते नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीरियाच्या ड्रुझ समुदायाशी आमचे खोल नाते आहे. त्यामुळे आम्ही त्या समाजाचे रक्षण करणार आहोत.