पावसाळ्यातील आजारांपासून दूर राहायचं? इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा
GH News July 16, 2025 07:09 PM

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात आजारांनाही आमंत्रण मिळू शकते. खरंतर यावेळी वातावरणात सर्वत्र ओलावा असतो आणि तापमानातील चढउतारांमुळे बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशी, डास आणि अनेक प्रकारचे कीटक वेगाने वाढतात. तर दुसरी कडे वातावरण्याच्या बदलामुळे पचनक्रिया कमकुवत होते आणि सर्दी, खोकला, फ्लू, डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजार होण्याची शक्यताही लक्षणीय वाढते. पचनसंस्था कमकुवत झाल्यामुळे या काळात शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता देखील कमी होऊ शकते. लवकर आजारी पडू नये म्हणून मजबूत रोगप्रतिकारक शक्ती असणे महत्वाचे आहे. तर तुम्ही या घरगुती पद्धतीने दोन प्रकारचे काढे बनवून त्यांचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबुत होते. चला तर मग आजच्या लेखात या काढ्यांची रेसिपी जाणून घेऊयात, ज्या पावसाळ्यात तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करतील.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी शरीराला पुरेशा पोषक तत्वांची आवश्यकता असते, म्हणून संतुलित आहार घेतला पाहिजे. PubMed मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, योग्य प्रमाणात पाणी, झिंक, मॅग्नेशियम सारखी खनिजे, सूक्ष्म पोषक तत्वे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची आहेत. याशिवाय, जीवनसत्त्वे C, D आणि E असलेले पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्ग टाळता येतो.

बाहेरील अन्न, अस्वास्थ्यकर अन्न टाळावे. याशिवाय, या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय देखील उपयुक्त ठरू शकतात, जसे की हळद, आले, तुळस. चला तर मग जाणून घेऊया 2 कढ्यांची रेसिपी…

रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे कढ्यांचे साहित्य

1 छोटा आल्याचा तुकडा, 5-6 तुळशीची पाने, 4 ते 5 काळी मिरी, दोन कप पाणी आणि कच्च्या हळदीचा एक छोटा तुकडा. याशिवाय, जर तुम्हाला चव हवी असेल तर तुम्ही एक चमचा मध किंवा गुळाचा एक छोटा तुकडा घेऊ शकता.

काढा बनवण्याची पद्धत

एका पॅनमध्ये पाणी घालून गॅसवर ठेवा. त्यात आले आणि तुळशीची पाने बारीक तुकडे करून त्यात कुस्करून घ्या. याशिवाय कच्ची हळद किसून त्यात टाका आणि काळी मिरी देखील पूड करून मिक्स करा. आता हे सर्व मिश्रण मंद आचेवर 10 मिनिटे उकळू द्या. जवळजवळ पाणी अर्धे झाल्यावर गॅस बंद करा. आता हा काढा थंड झाल्यावर गाळून घ्या, काही वेळ बाजूला ठेवा. जेव्हा हा काढा कोमट होईल तेव्हा त्यात मध टाकून प्या. हा काढा तुम्हाला फ्लूपासून वाचवेलच, शिवाय घसा खवखवणे, सर्दी आणि खोकल्यामध्ये देखील फायदेशीर आहे.

गुळवेलाचा काढा

हा काढा बनवण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे गुळवेल, गुळवेलाची फांदींचे किमान 3 ते 4 इंच आकाराचे दोन ते तीन तुकडे घ्या. याशिवाय, तुम्ही अर्धा चमचा दालचिनी पावडर किंवा एक छोटा तुकडा घ्यावा. यासोबत, तुम्ही 3 ते 4 तुळशीची पाने देखील घ्यावीत. तसेच चवीसाठी लिंबाचा रस घ्या. 2 कप पाणी घ्या

अशा प्रकारे काढा बनवा

एका भांड्यात पाणी घ्या आणि गुळवेलाची पाने किंवा फांदी बारीक करून पाण्यात टाका. आता यामध्ये दालचिनी आणि तुळशीची पाने टाका आणि मंद आचेवर 10-15 मिनिटे उकळवू द्या. काढा थंड झाल्यावर गाळून घ्या. त्यात लिंबाचा थोडा रस मिक्स करा. हा काढा पिण्यास चविष्ट लागतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत करतो. हा काढा प्यायल्याने तापापासूनही आराम मिळतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.