मुंबई : भारतीय स्टेट बँकेनं 16 जुलै रोजी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 25 हजार कोटी रुपयांच्या उभारणीचं नियोजनं केलं आहे. स्टेट बँकेनं QIP लाँच करुन स्टॉकची फ्लोअर प्राईस 811.05 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. ही रक्कम आजच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरच्या किंमतीपेक्षा 2.46 टक्क्यांनी कमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं आणलेला QIP पूर्णपणे सबस्क्राईब झाला तर हा भारतातील सर्वात मोठा QIP ठरणार आहे. यापूर्वी कोल इंडियानं 22560 कोटी रुपयांचा QIP आणला होता. स्टेट बँक ऑफ इंडियानं मे महिन्यात QIP ला मंजुरी दिली होती. यापूर्वी जून 2017 मध्ये स्टेट बँकेनं QIP द्वारे 15000 कोटी रुपयांची उभारणी केली होती.
याशिवाय स्टेट बँकेच्या बोर्डानं 2025-26 मध्ये बाँडसच्या मदतीनं 20000 कोटी रुपयांच्या उभारणीला देखील मंजुरी दिली आहे. फंड जमा करण्यासाठी बँक, डोमेस्टिक इनवेस्टर्सला Basel III कम्प्लायंट अतिरिक्त टीयर 1 आणि टीयर 2 बाँड जारी करेल. बँकेनं शेअर धारकांना सांगितलं की जिथं आवश्यकता असेल तिथं सरकारकडून मंजुरी घेतली जाईल.
स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्टॉक बीएसईवर 2 टक्क्यांनी वाढून 834 पर्यंत पोहोचला होता. बाजार बंद होईपर्यंत एसबीआयचा स्टॉक 831.55 रुपयावंर बंद झाला. बँकेचं बाजारमूल्य 7.42 लाख कोटी इतकं आहे. शेअरची दर्शनी किंमत 1 रुपया असून 2 महिन्यात 42 टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या 3 महिन्यात स्टॉक 8 टक्क्यांनी वाढला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात मार्च 2025 पर्यंत सरकारकडे 57.43 टक्के भागीदारी आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरबाबत कव्हरेज करणाऱ्या 50 विश्लेषकांपैकी 40 जणांनी बाय रेटिंग दिलं आहे. 9 विश्लेषकांनी होल्ड रेटिंग दिलं आहे. तर, एका विश्लेषकानं विक्री करण्याचं रेटिंग दिलं आहे. ब्रोकरेज फर्म जेफरीजनं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्टॉकला बाय रेटिंग सह टारगेट प्राईस 960 रुपये दिलं आहे.
दरम्यान मार्च तिमाहीत कंपनीचा नफा 10 टक्क्यांनी घटला आहे. स्टँडअलोन बेसिसवर निव्वळ नफा 10 टक्क्यांनी घटून 18642.59 कोटी रुपये झाला होता. स्टेट बँकेच्या स्टॉकमध्ये आज वाढ झाल्यानं गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा