अनुभवी फलंदाज आणि देशांतर्गत स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या करुण नायर याला क्रिकेटने पुन्हा एकदा संधी दिली. बीसीसीआय निवड समितीकडून करुण नायर याची इंग्लंड विरूद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली. करुणला इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या तिन्ही सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. मात्र करुणला या संधीचा सोनं करता आलं नाही. करुणला या 3 सामन्यांमधील काही डावात ठिकठाक सुरुवात मिळाली. मात्र करुणला त्या संधीचा फायदा घेता आला नाही. त्यामुळे आता चौथ्या कसोटीतून करुणला डच्चू देण्यात येऊ शकतो.
लॉर्ड्स कसोटीतील दुसऱ्या डावात ब्रायडन कार्स याने टाकलेला बॉल करुणने सोडला. करुण यावर चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. विराट कोहली याच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाला तिसऱ्या स्थानी खेळणाऱ्या अनुभवी खेळाडूची गरज होती. करुण नायर या जागेसाठी प्रबळ दावेदार समजला जात होता. करुणला तिसऱ्या स्थानी मोठी खेळी करुन पुन्हा एकदा संघात स्थान भक्कम करण्याची संधी होती. मात्र करुणला तसं काही करता आलं नाही.
टीम इंडिया इंग्लंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. तर उभयसंघातील चौथा सामना हा 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारताला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे हेड कोच गौतम गंभीर आणि कर्णधार शुबमन गिल करुणवर विश्वास दाखवत पुन्हा एकदा संधी देणार? की साई सुदर्शन याचं पहिल्या कसोटीनंतर पुन्हा कमबॅक होणार? याकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
साई सुदर्शनला पहिल्या सामन्यातून कसोटी पदार्पणाची संधी देण्यात आली होती. मात्र साईला पदार्पणात काही खास करता आलं नाही. त्यानंतर आता साईला पुन्हा संधी दिली जाते का? याकडे क्रिकेट वर्तुळाची करडी नजर असणार आहे.
दरम्यान करुन नायर याने इंग्लंड विरूद्धच्या 3 कसोटी सामन्यांमधील 6 डावांमध्ये 21.83 च्या सरासरीने आणि 52.61 अशा स्ट्राईक रेटने 249 चेंडूत 131 धावा केल्या आहेत. करुणने यादरम्यान 18 चौकार लगावले आहेत.