टीम इंडियाला तिसऱ्या कसोटीत पराभूत व्हावं लागलं. या सामन्यात इंग्लंडने भारतावर मात करत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 193 धावांचा पाठलाग करताना भारताला 170 धावांपर्यंतच पोहचता आलं. या सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या 2 खेळाडूंना दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं. उपकर्णधार ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज आकाश दीप या दोघांना दुखापत झाली. मात्र आकाशच्या तुलनेत पंतच्या दुखापतीमुळे भारताचं टेन्शन वाढलं आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना हा मँचेस्टरमध्ये 23 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात ऋषभ पंत याला दुखापतीमुळे खेळता येणार की नाही? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
भारतीय संघाला लॉर्ड्समध्ये झालेला तिसरा कसोटी सामना अवघ्या 22 धावांनी गमवावा लागला. भारताला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे भारतीय संघाने आत सरावाला सुरुवात केली आहे. सरावाच्या पहिल्या दिवशीच पंतच्या दुखापतीबाबत आलेल्या अपडेटबाबत जाणून घेऊयात.
पंतला तिसऱ्या सामन्यात विकेटकीपिंग करताना दुखापत झाली होती. त्यामुळे पंतला दुखापतीनंतर दोन्ही डावात विकेटकीपिंग करता आली नव्हती. पंतच्या जागी युवा ध्रुव जुरेल याने विकटेकीपरची भूमिका पार पाडली. पंतने दोन्ही डावात बॅटिंग केली. मात्र पंतला या दरम्यान हातातून ग्लोव्हज काढतानाही मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचं जाणवत होतं. त्यामुळे पंतला झालेली दुखापत किती तीव्र असू शकते, याचा अंदाज येऊ शकतो.
पंतवर आवश्यक उपचार केले जाणार आहेत. पंतला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आलं आहे. तो लवकरच बरा होईल, अशी माहिती कर्णधार शुबमन गिल याने तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर दिली होती.
स्पोर्ट्स तकनुसार, टीम इंडियाने केंटमध्ये सरावाला सुरुवात केली. तेव्हा टीम इंडियासह ऋषभ पंतही उपस्थित होता. पंत पूर्णपणे फिट आहे. पंत चौथ्या कसोटीत खेळताना दिसणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी आणि चाहत्यांसाठी हा मोठा दिलासा समजला जात आहे.
दरम्यान ऋषभ पंत याने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या 3 सामन्यांमध्ये आतापर्यंत बॅटिंगने अप्रतिम कामगिरी करुन दाखवली आहे. पंत या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा टीम इंडियाचा आणि एकूण दुसरा फलंदाज आहे. या यादीत शुबमन गिल पहिल्या स्थानी आहे. तर पंतने 3 सामन्यांमधील 6 डावांमध्ये 425 धावा केल्या आहेत. पंतने या दरम्यान 2 शतकं आणि 2 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच पंतने या दरम्यान 46 चौकार आणि 15 षटकार लगावले आहेत. त्यामुळे पंतकडून चौथ्या सामन्यातही अशीच फटकेबाजी अपेक्षित असणार आहे.