अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सप्टेंबरमध्ये पाकिस्तानला भेट देण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी माध्यमांमध्ये गुरुवारी ही बातमी प्रसिद्ध झाली. पाकिस्तानच्या दोन प्रमुख वृत्तवाहिन्या जिओ न्यूज आणि एआरवाय न्यूजने हा दावा केला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या इतर अनेक माध्यम संस्थांनीही हे वृत्त प्रकाशित केले. अमेरिकेकडून त्यावर तातडीने स्पष्टीकरण करण्यात आले. व्हाईट हाऊसने या वृत्ताचे खंडन केले आहे. शेवटी पाकिस्तानकडून हे वृत्त मागे घेण्यात आले. जिओ न्यूजला माफीनामा द्यावा लागला.
सध्या पाकिस्तान माध्यमांकडून विविध प्रकारच्या बातम्या पेरल्या जात आहेत. पाकिस्तानच्या दोन प्रमुख वृत्तवाहिन्या जिओ न्यूज आणि एआरवाय न्यूजने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केली. त्या बातमीनुसार, ट्रम्प सप्टेंबरमध्ये पाकिस्तानला भेट देण्याची योजना आखत आहेत. यानंतर पाकिस्तानच्या इतर अनेक माध्यम संस्थांनीही हे वृत्त प्रकाशित केले.
जिओ न्यूजला या बातमीनंतर माफीनामा द्यावा लागला. ट्रम्प यांच्या दौऱ्याबाबत सत्यता न पडताळता बातमी प्रसारित केल्याबद्दल जिओ न्यूजकडून माफी मागण्यात आली. एआरवाय न्यूजच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांनी ट्रम्प यांच्या भेटीचे ठिकाण मागे घेतले. दरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आम्हाला ट्रम्प यांच्या दौऱ्याबाबत काहीच माहिती नाही, असे म्हटले होते. त्यामुळे पाकिस्तानमधील माध्यमे तोंडघशी पडले.
पाकिस्तानमधील अनेक वृत्तवाहिन्यांनी डोनाल्ड ट्रम्प 18 सप्टेंबर रोजी पाकिस्तान दौरा करण्याची शक्यता आहे, असे म्हटले होते. त्यानंतर ते भारतातही जाऊ शकतात, असे या बातम्यांमध्ये म्हटले गेले होते. व्हाइट हाऊसकडून या बातम्यांचे त्वरित खंडन करण्यात आले. व्हाईट हाऊसने म्हटले की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तान दौरा निश्चित झाला नाही. त्यानंतर इस्लामाबादमधील अमेरिकन दूतावासातील प्रवक्तानेही ट्रम्प यांच्या दौऱ्याबाबत आमच्याकडे काहीच माहिती नसल्याचे म्हटले.