भारतीय नर्स निमिषा प्रिया हिची फाशी सध्या तरी टळली आहे. मृत तलालचे कुटुंबीय आणि निमिषा यांच्यात ब्लडमनी बद्दल अंतिम तोडगा न निघाल्याने येमेन तुरुंग अधिकाऱ्यांनी हे पाऊल उचललं आहे. काही वर्षांपूर्वी निमिषाने तलाल महदीला एक इंजेक्शन दिले होते, ज्यामुळे त्याचा जीव गेला. या इंजेक्शनमध्ये केटामाइन नावाचे औषध होते. पण मला तलालला मारायचे नव्हते, माझा हेतु त्याला फक्त त्याला बेशुद्ध करण्याचा होता असा दावा वारंवार निमिषाकडून केला जात आहे.
जुलै 2017 साली तलालच याचे निधन झाले. द न्यूज मिनिटच्या एका जुन्या रिपोर्टमध्ये निमिषा आणि तिच्या कुटुंबावर आधारित एक बातमी होती, अनेक वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या या अहवालात केटामाइनचे नाव पुढे आले होते. हे एक शक्तिशाली डिसोसिएटिव्ह ॲनेस्थेटिक औषध आहे, जे वैद्यकीय क्षेत्रात वापरले जाते, कधीकधी ते बेकायदेशीर ड्रग्जच्या गैरवापरासाठी देखील वापरले जाते.
त्या रात्री काय घडलं ?
भारतीय नर्स असलेल्या निमिषाच्या हातून तलालचा मृत्यू कसा झाला याची कहाणी पूर्णपणे फिल्मी आहे. निमिषाशी झालेल्या संभाषणाच्या आधारे प्रकाशित झालेल्या अहवालात असे म्हटले आहे की जुलै 2017 मध्ये मध्ये तिने तलालला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन दिले होते. तिला त्याच्याकडे असलेला पासपोर्ट मिळवायचा होता, कारण तोच पासपोर्ट ताब्यात ठेऊन तलाल तिला ब्लॅकमेल करत होता. निमिषाच्या सांगण्यानुसार, येमेनमध्ये तिने उघडलेल्या क्लिनिकजवळ एक तुरुंग होता, त्याच तुरूंगाच्या वॉर्डनने तिला तलालला बेशुद्ध करण्याचा सल्ला दिला होता. आपण त्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि पासपोर्ट मिळवून देण्यास मदत करू, असेही त्यांनी सांगितल्याचा दावा निमिषाने केला.
निमिषाने यासाठी तयारी केली. तिला जेव्हा संधी मिळाली तेव्हा तिने त्याला भूल देण्याचे इंजेक्शन दिले, परंतु त्या इंजेक्शनचा तलालवर कोणताही परिणाम झाला नाही, कारण तो आधीच ड्रग्ज घेत होता. यानंतर निमिषाने त्याला केटामाइनचे इंजेक्शन दिले, जेव्हा तो घरी ड्रग्ज घेत होता तेव्हा तिने हे केले. काही मिनिटांतच तो जमिनीवर कोसळला आणि जोरजोरात ओरडायला लागला. अचानक त्याच्या हृदयाची धडधड थांबली. ते पाहून निमिषाने नर्स असलेल्या तिच्या मैत्रिणीला हनानला फोन केला. तिला तलालबद्दल सगळंच माहीत होतं. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे करण्यात आले आणि ते पाण्याच्या टाकीत फेकून दिले. या प्रकरणात हनानला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि निमिषाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
केटामाइन काय असतं ?
केटामाइन हे जलद-असर करणारं भूल देणारे औषध आहे, ते वेदना कमी करणारे एजंट म्हणून देखील वापरले जाते. WHO च्या अहवालानुसार, ते NMDA रिसेप्टरला ब्लॉक करून कार्य करते, जे मेंदू आणि शरीरातील संपर्क तात्पुरते तोडतं. वैद्यकीय क्षेत्रात, शस्त्रक्रियेदरम्यान याचा अनेकदा वापर केला जातो किंवा शस्त्रक्रियेनंतर तीव्र वेदना झाल्यास रुग्णांना हे दिलं जातं.
नशेसाठीही होतो वापर
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या सांगण्यानुसार, भूल देण्याव्यतिरिक्त, केटामाइनचा वापर नैराश्य आणि PTSD वर उपचार करण्यासाठी देखील केला जातो. याशिवाय, ते व्यसनासाठी देखील वापरले जाते. हे डेट रेप ड्रग म्हणून देखील प्रसिद्ध आहे, ते रेव्ह पार्ट्यांमध्ये देखील वापरले जाते, जे स्पेशल के म्हणून ओळखले जाते. केटामाइन हे वैद्यकीय क्षेत्रात सर्वात जास्त वापरले जाते, तिथे ते इंजेक्शनच्या स्वरूपात घेतले जाते, याशिवाय, ते नाकातून स्प्रे स्वरूपात घेतले जाते.
किती विषारी असतं ?
केटामाइनचा वापर खूप कमी प्रमाणात केला जातो; ते उपचारात्मक हेतूंसाठी 0.51 mg (मिलीग्राम) पर्यंत वापरला जातं. 10 ते 15 मिलीग्रामच्या डोसमुळे बेशुद्ध होणं, भ्रम, गोंधळ, अनियंत्रित रक्तदाब, श्वासोच्छवासाच्या समस्या आणि मृत्यू देखील होऊ शकतो. तसेच हे जर इतर कोणत्याही मादक पदार्थासोबत घेतले तर त्याचे अगदी कमी प्रमाण देखील प्राणघातक ठरू शकते.