काल विधानभवनामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. ये ते होना ही था! हे घडणारच होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी विधिमंडळाच्या आवारात जमा होणाऱ्या गर्दीवर प्रश्न उपस्थित केला.
पूर्वीच्या चार-सहा अधिवेशनात मी सातत्याने हा मुद्दा उपस्थित केला की, अधिवेशन काळामध्ये इतके लोक येतात कशी? यांना पास देतो कोण? रेल्वे स्थानकाप्रमाणे सभागृह फुललेले असते. या गर्दीमुळे काहीतरी अघटीत घडेल आणि अशा गर्दीला आळा बसेल असे मला वाटत होते. कारण गर्दीतून वाट काढत सभागृहातून बाहेर यावे लागते. मुख्य दरवाजाचा सेल्फी पॉ़इंट झाला आहे. पायऱ्यांवर कुणी येते आणि फोटो काढत असतो. अरे चालले काय? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, विधिमंडळाच्या पासच्या विक्री होती अशी बातमी मागे आली होती. पण काल थोडक्यात वाचले. भविष्यात याला आळा बसला नाही तर परिस्थिती फार भयानक होईल. आत येऊन एकमेकांना भिडणे, एकमेकांचे हिशेब चुकते करण्याची जागा विधानभवन होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
https://www.youtube.com/watch?v=xb6kz9ddy7o
विधिमंडळाच्या आवारात, फ्लोअरवर आणि लॉबीतही काही पक्षाचे लोक छातीवर चिन्ह लावून खुलेआम वावरत असतात. काय चालले आहे हे? असा सवाल करत सत्ताधारी पक्षाने जाहीर सांगितले की, काही करा आणि बॉसकडे या, अशी टीकाही भास्कर जाधव यांनी केली.