विधानभवन परिसरात दोन दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती, त्यानंतर दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनातच जोरदार हाणामारी झाली होती. त्याआधीही आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये एकाला मारहाण केली होती. या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी गंभीर परिस्थिती – उद्धव ठाकरे
याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांपासून सत्तेचा माज दिसत आहे, आपण आधी आमदाराची बॉक्सिंग पाहिली, काल विधिमंडळाच्या आवारात हाणामारी झाली. महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागेल अशा या घटना आहेत.विधिमंडळात किंवा विधानभवन परिसरात गुंडागर्दी होत असेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.’
याआधी असं कधी घडलं नव्हत – उद्धव ठाकरे
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘सर्व पक्षांनी एकत्र बसून पक्षातील गुंडांना पदावरून हटवलं पाहिजे. विधीमंडळ परिसरात असा राडा होत असेल तर देशामध्ये राज्याची प्रतिमा काय झाली असेल? याआधी असं कधी घडलं नव्हत. लोकशाहीचा खून करणारे असेल लोक विधिमंडळात वावरायला लागले तर जनतेने काय करायचं?’
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मनसेसोबतच्या युतीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, वीस वर्षांनंतर आम्ही पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आलो, पहिल्यांदा मराठीच्या विषयावर एकत्र आलेलो आहोत. मी तेव्हाच सांगितलं आहे की आम्ही एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी, त्यामुळे आम्ही मराठीच्या विषयावर एकत्र राहणारच. मुद्दा पुढे येतो तो राजकारणाचा आज कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाहीये, ज्यावेळी निवडणूक जाहीर होईल त्यावेळी आम्ही त्यावर चर्चा करू, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला. कोणत्याही भाषेची सक्ती आम्ही लागू करू देणार नाही, याचा अर्थ असा होत नाही की आम्ही एखाद्या भाषेला विरोध करतोय असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.