ENG vs IND : रवींद्र जडेजा मँचेस्टरमध्ये महारेकॉर्ड करण्यासाठी सज्ज, ठरणार पहिलाच भारतीय
GH News July 18, 2025 10:10 PM

टीम इंडियाचा स्टार आणि अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने आतापर्यंत इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांत अप्रतिम कामगिरी केली आहे. जडेजाने चाबूक बॅटिंग करत इंग्लंडच्या गोलंदाजांना धाकात ठेवलं आहे. जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत असंख्य विक्रम त्याच्या नावावर केले आहेत. आता जडेजाला इंग्लंड विरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात मोठा कीर्तीमान प्रस्थापित करण्याची संधी आहे. उभयसंघातील चौथा कसोटी सामना हा मँचेस्टरमध्ये 23 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. जडेजाला या सामन्यात दिग्गज सर गॅरी सोबर्स यांच्या पंगतीत धडक देण्याची संधी आहे.

सर गॅरी सोबर्स

विंडीजचे माजी दिग्गज सर गॅरी सोबर्स हे इंग्लंडमध्ये 6 ते 11 व्या स्थानादरम्यान बॅटिंग करताना 1 हजार धावा करणारे एकमेव फलंदाज आहेत. सोबर्स यांनी 16 डावांत 84 च्या सरासरीने 1 हजार 97 धावा केल्या. त्यामध्ये 4 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. तर आता जडेजाला सोबर्स यांच्यासारखी कामगिरी करण्याची संधी आहे.

रवींद्र जडेजाची इंग्लंडमधील कामगिरी

जडेजाने आतापर्यंत इंग्लंडमध्ये 27 डावांमध्ये 40.95 च्या सरासरीने 942 धावा केल्या आहेत. तसेच जडेजाने इंग्लंडमध्ये 1 शतक आणि 7 अर्धशतकं झळकावली आहेत. विशेष म्हणजे जडेजाने इंग्लंड विरूद्धच्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत सलग 4 अर्धशतकं ठोकली आहेत.

आता जडेजाला इंग्लंडमध्ये 1 हजार कसोटी धावा करण्याची संधी आहे. जडेजाला त्यासाठी फक्त 58 धावांची गरज आहे. जडेजाचा मँचेस्टरमध्येच या धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे.

जडेजा कीर्तीमान करण्यासाठी सज्ज

रवींद्र जडेजा ठरला तिसराच भारतीय

जडेजा इंग्लंडमध्ये सलग 4 अर्धशतक करणारा तिसरा भारतीय ठरला आहे. जडेजाआधी भारतासाठी ऋषभ पंत आणि सौरव गांगुली या दोघांनी ही कामगिरी केली आहे. जडेजाने इंग्लंड विरूद्ध लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीतील दुसर्‍या डावात नाबाद अर्धशतक ठोकलं होतं. जडेजाने 193 या विजयी धावांचा पाठलाग करताना नाबाद 61 धावांची झुंजार खेळी केली होती. मात्र भारताचा अवघ्या 22 धावांनी पराभव झाला. इंग्लंडने या विजयासह मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडियासमोर मँचेस्टरमध्ये होणारा चौथा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.