हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने दुसर्या एकदिवसीय सामन्यात बॅटिंगने निराशा केली आहे. पावसामुळे 29 षटकांच्या या सामन्यात भारतीय संघाला 150 धावांचा टप्पाही पार गाठता आला नाही. त्यामुळे इंग्लंडला ‘करो या मरो’ सामन्यात विजयासाठी 144 धावा कराव्या लागणार आहेत. स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा या दोघींचा अपवाद वगळता इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांना तग धरता आला नाही. भारताने 8 विकेट्स गमावून 143 धावा केल्या. त्यामुळे आता भारतीय गोलंदाज इंग्लंडला रोखून सलग दुसरा सामना जिंकून मालिका नावावर करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
उभयसंघातील सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पावसाने सामन्यात खोडा घातला. पावसामुळे तब्बल 4 तासांचा खेळ वाया गेला. पावसामुळे सामना 29 ओव्हरचा होणार असल्याच ठरलं. इंग्लंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली.
इंग्लंडच्या गोलंदाजांनी कर्णधार नॅट सायव्हर ब्रँट हीचा निर्णय योग्य ठरवला. इंग्लंडने भारताला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे भारताची दुरावस्था झाली होती. मात्र ओपनर स्मृती मंधाना आणि त्यानंतर दीप्ती शर्मा हीने चिवट खेळी केली. त्यामुळे भारताला 140 पार पोहचता आलं.
टीम इंडियासाठी स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा आणि हर्लीन देओल आणि अरुधंती रेड्डी या चौघींनाच दुहेरी आकड्यापर्यंत पोहचता आलं. तर ओपनर प्रतिका रावल, कर्णधार हरमनप्रीत कौर, जेमीमाह रॉड्रिग्स आणि रिचा घोष यांनी निराशा केली.
कोण जिंकणार दुसरा सामना?
स्मृतीने 51 चेंडूत 82.35 च्या स्ट्राईक रेटने 5 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 42 धावा केल्या. हर्लीन देओल हीने 16 धावांच्या खेळीत 1 चौकार लगावला. अरुंधती रेड्डीने 14 धावांचं योगदान दिलं. दीप्ती शर्मा हीने 34 बॉलमध्ये 2 फोरसह नॉट आऊट 30 रन्स केल्या. तर इंग्लंडकडून एकूण 5 जणींनी बॉलिंग केली.त्यापैकी लॉरेन बेल हीचा अपवाद वगळता इतर चौघी विकेट मिळवण्यात यशस्वी ठरल्या. सोफी एक्लेस्टोन हीने तिघांना बाद केलं. लेन्सी स्मिथ आणि एम आर्लोट या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर चार्ली डीन हीने 1 विकेट मिळवली.
दरम्यान टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात इंग्लंड विजय मिळवून मालिकेत आव्हान कायम राखण्यात यशस्वी ठरते की भारतीय महिला ब्रिगेड लॉर्ड्समध्ये मैदान मारते, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.