वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानला झटका देत एकदिवसीय मालिका रद्द करण्यास थेट आणि स्पष्ट नकार दिला आहे. नियोजित वेळापत्रकानुसारच मालिका होणार असल्याचं विंडीज क्रिकेट बोर्डाचं म्हणणं आहे. त्यामुळे खेळायचं की नाही? हे पाकिस्तानने ठरवायचं आहे. एकदिवसीय मालिका रद्द करुन जास्तीचे टी 20I सामने खेळवावेत, असा प्रस्ताव पीसीबीने(Pakistan Cricket Board) विंडीज बोर्डासमोर ठेवला होता. मात्र विंडीज बोर्डाने निर्णय जाहीर करत भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तान मेन्स टीमला ऑगस्ट महिन्यात विंडीज दौऱ्यावर जायचं आहे. या दौऱ्यात पाकिस्तान विंडीज विरुद्ध प्रत्येकी 3-3 सामन्यांची टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टी 20i मालिकेचा थरार 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान रंगणार आहे. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्ट दरम्यान एकदिवसीय मालिका पार पडणार आहे.
पीटीआयने पीसीबी सूत्रांचा हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, विंडीज बोर्डाचे अधिकारी आणि पीसीबी सीईओ सुमैर अहमद यांच्यात बैठक झाली. विंडीजच्या अधिकाऱ्यांनी एकदिवसीयऐवजी अधिकचे टी 20i सामने खेळवता येणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच वेळापत्रकातही कोणताही बदल होणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे आता पाकिस्तान विंडीज दौऱ्यावर जाणार की नाही? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला विंडीज बोर्डाचे अधिकारी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. विंडीज बोर्डाने टी 20i मालिकेतील सामन्यांच्या तिकीट विक्रीला सुरुवात केली आहे.
एकदिवसीय मालिकेऐवजी अधिकाअधिक टी 20i सामने खेळवण्यात यावेत, अशी पीसीबीची मागणी होती. मात्र विंडीजच्या नकारामुळे पाकिस्तान नियोजित वेळापत्रकानुसार खेळण्यास तयार होते का? हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान विंडीज सध्या मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20i मालिका खेळत आहे. तर पाकिस्तानच्या बांग्लादेश दौऱ्याला 20 जुलैपासून सुरुवात होत आहे. उभयसंघात 3 सामने खेळवण्यात येणार आहेत.