वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जर भारतच अस्तित्वात राहिला तर कोण वाचणार असे वक्तव्य करत काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे स्मरण करत स्वत:च्या पक्षाला सल्ला दिला आहे. काँग्रेस अंतर्गत टीकेला तोंड देणारे तिरुअनंतपुरमचे खासदार थरूर यांनी राष्ट्रीय हितांसाठी पक्षाच्या भूमिकेला बाजूला ठेवत काम केले जावे, कुठल्याही लोकशाहीत प्रतिस्पर्धा असते, परंतु देशाप्रकरणी सर्वांनी एक व्हायला हवे असे म्हटले आहे.
आमची काही मूल्यं आणि विश्वास आहे, जी आम्ही आमच्या पक्षात कायम राखायला हवी. परंतु राष्ट्रीय सुरक्षेप्रकरणी पक्षाच्या धोरणाला बाजूला ठेवत काम केले जावे. जर एखादा मुद्दा देशहिताचा असेल तर अन्य पक्षांसोबत सहकार्य करण्याची गरज आहे. आम्हाला त्यावेळी प्रतिस्पर्धेला विसरावे लागेल असे थरूर म्हणाले.
माझ्यासाठी राष्ट्र सर्वोपरि आहे आणि पक्ष देश सुधारण्याचे केवळ एक माध्यम आहे. तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल, त्या पक्षाचा उद्देश स्वत:च्या पद्धतीने एक चांगला भारत घडविणे असावा. एक चांगला भारत घडविण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती यावर असहमत होण्याचा पूर्ण हक्क पक्षांना असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे.
माझ्या भूमिकेवर ठाम राहणार
आमच्या संसदेत सध्या 46 राजकीय पक्ष आहेत, काही मुद्द्यांवर हे सर्व पक्ष एकजूट होतील असा माझा निश्चितपणे दृढ विश्वास आहे. अलिकडेच आमचा देश आणि आमच्या सीमांवर जे काही घडले, त्यासाठी आमची सशस्त्र दलं आणि आमच्या सरकारचे समर्थन केल्याने अनेक लोक माझ्यावर टीका करत आहेत. परंतु मी माझ्या भूमिकेवर ठाम राहणार आहे कारण देशासाठी हेच योग्य असल्याचे माझे मानणे आहे. जेव्हा मी भारताबद्दल बोलतो, तेव्हा मी सर्व भारतीयांबद्दल बोलत असतो असे उद्गार थरूर यांनी काढले आहेत.
काँग्रेसमध्ये नाराजी
ऑपरेशन सिंदूरवरून अमेरिकेते गेलेल्या एका सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व थरूर यांनी केल्यावर काँग्रेस नेतृत्वासोबतचे त्यांचे मतभेद वाढले आहेत. कूटनीतिक प्रकरणांमध्ये पंतप्रधान मोदींची प्रशंसा करणारे लेख थरूर यांनी लिहिले होते. यामुळे काँग्रेस नेतृत्व चांगलेच नाराज झाले आहे. काँग्रेस नेतृत्वाने थरूर यांना आता केरळमधील पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर ठेवल्याचे चित्र दिसून येत आहे.