Manikrao Kokate New Video : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी हा पत्त्यांचा गेम खेळत असल्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे राज्यात शेतकरी संकटात आहे आणि कृषीमंत्री ऑनलाईन जुगार खेळत आहेत, अशी टीका केली जात आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. मात्र कोकाटे यांनी मी जुगार खेळत नव्हतो, असा दावा केलेला आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोकाटे यांचे आणखी काही व्हिडीओ समोर आणले आहेत. या व्हिडीओंच्या माध्यमातून कोकाटे हे ऑनलाईन जुगारच खेळत होते, असा दावा केलाय.
जितेंद्र आव्हाड गेल्या काही दिवसांपासून कोकाटेंवर सडकून टीका करत आहेत. त्यांनी नुकतेच आपल्या एक्स या खात्यावर कोकाटेंचे नवे व्हिडीओ ट्वीट केले आहेत. सोबतच एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे, प्रश्नौत्तरांचा तास सुरू आहे. अन् दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते जाहिरात बघत होते असे सांगण्यात येत होते. आता मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा, असे म्हणत आव्हाड यांनी महाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकलाय, असा हल्लाबोल केलाय.
तसेच, कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे या व्हिडीओत दिसेल. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. तसेच कोकाटे हे ऑनलाईन जुगाराच खेळेत होते असा दावा करत त्यांनी मागाल तेवढे पुरावे देतो, असं थेट सांगून टाकलंय. त्यामुळे आता या नव्या व्हिडिओंप्रकरणी माणिकराव कोकाटे नेमकं काय स्पष्टीकरण देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोकाटे यांचा विधिमंडळातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मी ऑनलाईन जुगार खेळत नव्हतो. मी मोबाईलमध्ये आलेली जाहिरात स्कीप करत होतो, असं सांगितलं होतं. त्यांच्या या व्हिडीओमुळे राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. सध्या राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे कोकाटे यांच्या राजीनाम्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील, असे सूचक विधानही खासदार तटकरे यांनी केले आहे.