टीम इंडियाची इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची जवळपास 2 दशकांची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. भारतीय संघाने इंग्लंडमध्ये आजपासून 18 वर्षांआधी अखेरची कसोटी मालिका जिंकली होती. भारताने राहुल द्रविड याच्या नेतृत्वात 2007 साली इंग्लंडला धुळ चारत मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. तेव्हापासून भारताला इंग्लंडमध्ये मालिका जिंकता आली नाही. भारत सध्या अँडरसन-तेंडुलकर सीरिजमध्ये 1-2 ने पिछाडीवर आहे. आता या मालिकेतील फक्त 2 सामने शेष आहेत. भारत हे दोन्ही सामना जिंकून गेल्या अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे. मात्र भारतीय कसोटी संघाचा 90 वर्षांचा इतिहास पाहता हे स्वप्न यंदाही पूर्ण होणार नसल्याचं दिसतंय.
युवा आणि नवनियुक्त कर्णधार शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आली आहे. भारतीय फलंदाजांनी पहिल्या सामन्यात अप्रतिम कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र भारताला लीड्समध्ये विजयी सलामी देता आली नाही. भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर टीम इंडियाने जोरदार कमबॅक करत एजबेस्टनमध्ये विजय मिळवला. भारताचा हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एजबेस्टनमधील पहिलावहिला विजय ठरला. लॉर्ड्समध्येही गोलंदाजांनी अप्रितम कामगिरी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. मात्र फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला सलग दुसऱ्या विजयाला मुकावं लागलं. इंग्लंडने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली.
टीम इंडिया या सीरिजमध्ये 1-2 ने पिछाडीवर गेली. यामुळे भारत इंग्लंडमध्ये यंदाही कसोटी मालिका जिंकणार नाही, असं आकड्यांवरुन स्पष्ट होत आहे. भूतकाळातील आकडेवारीनुसार 1-2 ने मागे राहिल्यावर भारतीय संघाला मालिकेत विजय मिळवता आलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे भारताला अशा परिस्थितीत मालिका बरोबरीतही सोडवता आली नाही.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 किंवा 1-0 ने पछाडल्यानंतर त्या संघाला फक्त 3 वेळाच सीरिज जिंकता आली आहे.
ऑस्ट्रेलियाने 1936 साली 1-2 ने पिछाडीवर राहिल्यानंतर मालिका जिंकली होती. त्यानंतर विंडीजने 1992-1993 मध्ये 0-1 ने मागे राहिल्यानंतर मालिकेवर नाव कोरलं होतं. इंग्लंडने अशाचप्रकारे 1998 साली 0-1 ने मागे राहिल्यानंतर दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकली होती. त्यामुळे आकडे भारताच्या बाजूने नाहीत, हे स्पष्ट होतं.
त्यामुळे भारताला इंग्लंडमध्ये मालिका जिंकायची असेल तर इतिहास घडवावा लागणार आहे. तसेच भारताने आतापर्यंत मँचेस्टरमध्ये एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. त्यामुळे भारतासमोर 23 जुलैपासून सुरु होणाऱ्या सामन्यात दुहेरी आव्हान असणार आहे.