भारतीय स्वयंपाकघरात तुपाला खास स्थान आहे. अनेक घरांमध्ये जेवणात तूप आवश्यक मानलं जातं. तसंच अनेक जण दिवसभरातील उर्जेसाठी सकाळची सुरुवात कॉफीने करतात. मात्र अलीकडे ‘बुलेटप्रूफ कॉफी’ नावाने एक नवा ट्रेंड सोशल मीडियावर गाजतोय ज्यात कॉफीमध्ये तूप मिसळून ती पितली जाते. ही पद्धत शरीराला ऊर्जा देते, पचन सुधारते आणि वजन कमी करण्यातही मदत करते, असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण हे कितपत सत्य आहे? याचा आहारतज्ज्ञांच्या मतांद्वारे आढावा घेऊया. (drink ghee coffee benefits risks in marathi)
तुपात कन्जुगेटेड लिनोलिक अॅसिड (CLA) आणि ब्युटायरेट सारख्या फॅटी अॅसिड्स असतात, जे शरीरातली अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात. हे घटक पचनक्रिया सुधारतात आणि आतड्यांचं आरोग्य टिकवून ठेवतात. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य तुपाचा वापर केल्यास बुलेटप्रूफ कॉफीचे फायदे मिळू शकतात. मात्र हा वापर नियमित, योग्य प्रमाणात आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार असणे महत्त्वाचे आहे.
पण लक्षात घ्या, तुपात कॅलरीज खूप जास्त असतात. त्यामुळे गरजेपेक्षा अधिक प्रमाणात तूप घेतल्यास ते शरीरात चरबी स्वरूपात साठू शकते आणि त्यामुळे लठ्ठपणा आणि इतर आजार होण्याचा धोका वाढतो. विशेषतः कामाचं प्रमाण कमी आणि बसून काम करणाऱ्या लोकांनी जास्त तुपाचे सेवन टाळणं योग्य ठरू शकतं.
तूप घालून कॉफी पिणं सगळ्यांनाच सूट होईल असं नाही. उच्च कोलेस्ट्रॉल असणारे, पचनास त्रास असणारे, आणि लठ्ठपणावर नियंत्रण ठेवू पाहणारे लोकांनी ही कॉफी टाळावी. तसंच काही विशिष्ट वैद्यकीय अटी असलेल्या लोकांनी देखील आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच तूप कॉफीचा वापर करावा.