इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात 22 धावांनी विजय मिळवून मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. इंग्लंडने यासह आता मालिका विजयाचा दावा मजबूत केला आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतीय संघाला मालिकेत कायम राहण्यासाठी चौथ्या सामन्यात विजय मिळवायचा आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात भारतीय संघांची अग्निपरीक्षा असणार आहे. शुबमन गिल भारतीय संघातं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध भारत चौथा कसोटी सामना बुधवार 23 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत चौथा कसोटी सामना मँचेस्टरमधील एमिरेट्स ओल्ट ट्रॅफर्ड मैदानात खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत चौथ्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.
इंग्लंड विरुद्ध भारत चौथ्या कसोटी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह मॅचचा आनंद घेता येईल.
इंग्लंडने सामन्याच्या 48 तासांआधी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली. यजमान संघाने दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडलेल्या शोएब बशीर याच्या जागी लियाम डॉसन याला संधी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताच्या 3 पैकी 2 खेळाडूंना दुखापतीमुळे चौथ्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. यामध्ये अर्शदीप सिंह आणि आकाश दीप या दोघांचा समावेश आहे. तर नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे मालिकेतूनच बाहेर झाला आहे. अशात आता प्लेइंग ईलेव्हनमध्ये शार्दूल ठाकुर आणि अंशुल कंबोज या दोघांना संधी मिळू शकते.
दरम्यान मँचेस्टरमध्ये टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकदाही विजय मिळवता आलेला नाही. भारताला या मैदानात खेळलेल्या 9 पैकी 4 सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. तर 5 सामने भारताने अनिर्णित राखले आहेत. त्यामुळे या मैदानात शुबमनसेना विजयाचं खातं उघडणार का? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.